
अजित पवार यांचा गेल्या महिन्यात 28 तारखेला बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. खंडवा जिल्ह्यातील पंधाना येथे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर टेकऑफ दरम्यान अचानक हवेतच गटांगळ्या खाऊ लागले. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यामध्ये हेलिकॉप्टर जमिनीवरून वर उडताच आधी डाव्या बाजूला झुकले, मग सरळ झाले आणि पुन्हा थोडे मागे वळल्याचे दिसते. सुमारे 36 सेकंदांच्या थरारानंतर हेलिकॉप्टरने सुरक्षित उड्डाण केले.
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव शनिवारी खंडवा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पंधाना येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते भोपाळला परतत होते. हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच ते अचानक पाठीमागच्या बाजूला गटांगळ्या खाऊ लागले आणि काही क्षणांसाठी थांबले. हेलिकॉप्टर अशा प्रकारे हेलकावे खाताना पाहून तेथे उपस्थित असलेले सुरक्षा रक्षक आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तात्काळ हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवले. जास्त धूळ उडू नये यासाठी वेग थोडा कमी करण्यात आला. काही सेकंदातच हेलिकॉप्टर स्थिर झाले आणि सुरक्षितपणे आकाशात झेपावले. यानंतर मुख्यमंत्री सुखरूप भोपाळला पोहोचले.
खंडवा में उड़ान भरते ही डगमगाया CM मोहन यादव का हेलीकॉप्टर, थम गई लोगों की सांसे #cmmohanyadav #khandwa pic.twitter.com/CA2rRfNlbh
— Shivam Dwivedi (@24ShivamDwivedi) February 16, 2026
दरम्यान, या घटनेबाबत खंडवाचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नव्हता. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही प्रक्रिया सामान्य असल्याचे सांगितले. टेकऑफच्या वेळी हेलिकॉप्टर ज्या दिशेला असायला हवे होते, त्या दिशेला गेले नव्हते. हवेत वर उड्डाण घेताना ते निश्चित दिशेला वळू लागले, तेव्हा मोठ्या प्रमाणात धूळ उडू लागली. धूळ कमी करण्यासाठी पायलटनी वेग कमी केला आणि हेलिकॉप्टर थोडे खाली आणून स्थिर केले.

























































