
हरयाणातील पालवाल जिल्ह्यातील चायनसा गावात गेल्या 15 दिवसात पाच विद्यार्थ्यांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने हे मृत्यू दुषित पाण्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
चायनसा गावात पंधरा दिवसांपूर्वी पासून अनेक जण थंडी ताप, सर्दी, अंगदुखी व उलट्यांच्या त्रासाने त्रस्त आहेत. यातील काहींची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी एकाच दिवशी या आजारांमुळे तिघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोग्य विभागाने या गावात एक वैद्यकीय कॅम्प आय़ोजित केला होता व अनेकांचे रक्ताचे नमुने तपासले मात्र अद्याप या आजाराचे कारण स्पष्ट झालेले नाही. या दरम्यान आणखी नऊ जणांचा मृत्यू झाला असून ते सर्व जण वर नमूद आजारांनी त्रासलेले होते.
दरम्यान गावकऱ्यांनी दुषित पाण्यामुळे हे सर्व घडत असल्याचा आरोप केला आहे. गावात पाण्याचा अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असतो. टँकरने अनेकदा पाणी आणले जाते. दुषित पाणी हे या मृत्यूंमागचे कारण असल्याची शक्यता गावकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. त्यानंतर आरोग्य विभागाने गावातील पाण्याचे नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत.



























































