
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात नुकत्याच झालेल्या अंतरिम व्यापार करारावरून (India-US Interim Trade Deal) राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी या करारावरून केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. “हा देश आत्मनिर्भर होत आहे की अमेरिका-निर्भर?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, “या करारामुळे हिंदुस्थानी शेतकरी आणि शेतीमाल उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. अमेरिकेतील प्रक्रिया केलेले फळे आणि इतर कृषी उत्पादनांसाठी हिंदुस्थानी बाजारपेठ खुली केल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होईल.” ते म्हणाले की, या करारामुळे हिंदुस्थानची ऊर्जा सुरक्षा आणि डिजिटल स्वातंत्र्य (Digital Freedom) अमेरिकेच्या फायद्यासाठी धोक्यात घातली जात आहे. डेटा प्रायव्हसीच्या बाबतीतही सरकारने तडजोड केल्याचा आरोप त्यांनी केला.
अमेरिकन मका, सोयाबीन, बदाम, अक्रोड आणि ताज्या फळांवरील आयात शुल्क कमी किंवा शून्य केल्यामुळे हिंदुस्थानी बाजारात अमेरिकन मालाचा पूर येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विशेषतः कापूस आयातीमुळे आधीच देशांतर्गत किमती घसरल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुरजेवाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “व्यापाराच्या नावाखाली देशहिताचा आणि जनहिताचा बळी दिला जाऊ शकत नाही.”

























































