रसायनी, खोपोली, कर्जतकरांसाठी एनएमएमटीची ‘भंगार’ बससेवा; दररोज बस बंद पडत असल्याने चाकरमान्यांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रसायनी, खोपोली, कर्जतकरांसाठी एनएमएमटीच्या परिवहन सेवेच्या भंगार बससेवेमुळे प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत, पावसाळ्यात खिडक्यांना तावदाने नसतात, अनेक बसेसच्या काचा फुटलेल्या आहेत, बसेसचा भयानक आवाज असतो. तसेच आसनव्यवस्था व्यवस्थित नसल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. या मार्गावर दररोज एक तरी बस बंद पडत असून नादुरुस्त बसेसमुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने बेलापूर, वाशी येथून खोपोली, रसायनी व कर्जत येथे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही बस सुरू केली आहे. विद्यार्थी, नागरिक, महिला, कामगार, रुग्ण व अन्य प्रवासी यांना ही सेवा खूप सोयीची आहे. मात्र जेव्हापासून या मार्गांवर ही बससेवा सुरू करण्यात आली तेव्हापासून जुन्या, नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

प्रवाशांनी बसला मारला धक्का
कित्येकदा तर रस्त्यावर मध्येच बसेस बंद पडण्याचे प्रकार घडत असून प्रवाशांवर बसला धक्का मारण्याची वेळ येत आहे. त्यामुळे खोपोली, कर्जत व रसायनी येथे सुस्थितीतील बसेस पाठविण्यात याव्यात अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून सुस्थितीतील बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी आणाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.