
निवडणुकांच्या घोषणा झाल्या की, ‘इंडिया ब्लॉक’ने जरूर जागे व्हावे व चर्चा कराव्यात, पण त्यापेक्षा जागेपणाने काही निर्णय एकत्र बसून घेण्यातच शहाणपण आहे. मोदी वगैरे लोकांनी जनतेला धर्माची भांग पाजली आहे. त्यामुळे देश प्रे. ट्रम्प यांचा गुलाम बनला आहे हे लोकांना ईश्वरी वरदान वाटत असावे. अशा वेळी लोकांच्या डोळ्यांवरील धार्मिक भांगेची नशा उतरवण्यासाठी काय करावे, हे ठरवायचे कोणी? संसदेतला गोंधळ वेगळा आणि देशातला गोंधळ वेगळा. लोकांचे अंतरात्मे जागरुक होत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ममता, स्टॅलिन की आणखी कोणी? यावर फैसला करावा लागेल!
महात्मा गांधी हे काँग्रेसचे आणि देशाचेही सर्वोच्च नेते होते. म. गांधींचा एक आतला आवाज होता. त्यानुसार ते निर्णय घेत असत. या आतल्या आवाजाला आध्यात्मिक, राष्ट्रभक्ती आणि निःस्वार्थपणाची धार होती. आज काँग्रेस पक्षातून अनेक आतले आवाज निघत आहेत. त्यामुळे आतल्या आवाजांचा कोलाहल माजला असल्याचे चित्र दिसते. देशासाठी हे चित्र बरे नाही. पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी या आतल्या आवाजांनी गोंधळ घातला आहे. मणिशंकर अय्यर, संजय बारू, भूपेन बोरा वगैरे मंडळींचे आतले आवाज नको त्या वेळी बाहेर आले. काँग्रेसची अवस्था त्यामुळे अवघडल्यासारखी झाली. केरळ, आसाम, प. बंगाल, तामीळनाडू आणि पुद्दुचेरी अशा पाच राज्यांत विधानसभा निवडणुका उंबरठ्यावर आहेत. त्याच वेळी मणिशंकर यांचा आतला आवाज बाहेर आला. अय्यर म्हणतात, ‘‘केरळात काँग्रेस विजयी होणे कठीण आहे. केरळ काँग्रेसमध्ये दुफळी आहे. एकमेकांवर कुरघोड्या केल्या जात आहेत. त्यामुळे डाव्या आघाडीचे पिनाराई विजयन पुन्हा मुख्यमंत्री होतील.’’ अय्यर यांच्या विधानाने काँग्रेसची अवस्था असहज झाली. ‘‘विजयन यांचे सरकार दोन वेळा सत्तेवर आले, पण तरीही जनमत त्यांच्या विरोधात नाही’’ असे प्रमाणपत्रही अय्यर यांनी दिले. अय्यर यांनी काँग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेनिथला यांच्यावरही अकारण टीका केली आहे. केरळातून प्रियंका गांधी, के. सी. वेणुगोपाल यांच्यासारखे नेते लोकसभेवर निवडून गेले. राहुल गांधीही अडचणीच्या काळात केरळवासी झाले, पण त्यांच्या पक्षाला विधानसभा जिंकता आली नाही. याची कारणमीमांसा श्री. अय्यर यांनी केली. अय्यर हे काँग्रेसचे जुने निष्ठावंत व राजीव गांधींचे निकटचे सहकारी, पण राहुल गांधींशी त्यांची कुंडली काही जमली नाही. अय्यर यांनी आता जाहीर केले की, ‘‘ते गांधीवादी आहेत, नेहरूवादी आणि राजीववादीसुद्धा आहेत, पण राहुलवादी नाहीत.’’ त्यांनी टोमणा मारला की, ‘‘राहुल गांधी विसरलेले दिसतात की, अय्यरसुद्धा काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत.’’ अय्यर आज काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते राहिलेले नाहीत, पण राजीव किंवा नरसिंह रावांच्या काळात त्यांची चलती होती. नरेंद्र मोदी यांच्या स्वभावाचे वर्णन करणारे
चपखल शब्द
अय्यर यांनी एकदा वापरले. त्यांच्याशी काँग्रेस असहमत झाली व अय्यर यांना पक्षातून काढून टाकले. मोदी यांच्याविरोधात तितक्याच प्रखर शब्दांत राहुल गांधी यांनी संसदेत आणि बाहेर हल्ले केले. राहुल गांधींना संसदेबाहेर कायमचे फेकण्याचे षड्यंत्र भाजपने आता रचले. हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणजेच अय्यर यांचा शब्दप्रयोग चुकला असला तरी मोदी व शहा यांच्याविषयी त्यांची भाकिते खरीच ठरली. पंतप्रधानांनी देशाला अमेरिकेचे गुलाम करणे ही भारतीय राजकारणातली ‘नीचतम’ पातळी आहे. अय्यर यांची आदळआपट सुरू असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे एकेकाळचे ‘मीडिया सल्लागार’ संजय बारू यांनी ‘इंडिया आघाडी’चे नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे देण्याची भूमिका मांडली. ते म्हणतात, ‘‘ममता बॅनर्जी विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्यास अधिक समर्थ आहेत. ज्या पद्धतीने ममता अनेक आघाड्यांवर लढत आहेत, त्यामुळे एक महिला नेत्या म्हणून प्रादेशिक, राष्ट्रीय पातळीवर मजबूत झाल्या आहेत.’’ बारू ‘टेलिग्राफ’मधील लेखात असेही लिहितात की, ‘‘मनमोहन सिंग व सोनिया गांधींमध्ये जो संवाद व समन्वय होता तसा राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्यात दिसत नाही.’’ अर्थात ही बारू यांची मते असली तरी तृणमूल काँग्रेसने ही भूमिका उचलून धरलेली आहे व ‘‘ममतांकडे ‘इंडिया आघाडी’चे नेतृत्व द्या,’’ असे आतले आवाज तृणमूलमध्येही निघत आहेत. त्याच वेळी अय्यर यांचाही आतला आवाज पुन्हा फुटला व त्यांनी ‘इंडिया आघाडी’चे नेतृत्व तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे द्यावे अशी मागणी केली. ‘‘राहुल गांधी हे भविष्यात पंतप्रधान होतील. अशा वेळी इंडिया ब्लॉक मजबूत करण्याची जबाबदारी स्टॅलिनकडे द्यावी. प्रादेशिक पक्ष व त्यांच्या हक्कांचा मुद्दा स्टॅलिन यांनी जितका जोरकसपणे मांडला तितका दुसऱया कोणी तो मांडला नाही,’’ असे अय्यर यांचे मत आहे. ते काही असले तरी इंडिया आघाडीच्या
नेतृत्व बदलाचा मुद्दा
पुन्हा उठला आहे हे महत्त्वाचे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ‘इंडिया आघाडी’चे नक्की काय झाले? हा प्रश्न अनेकांना पडला असला तरी तो प्रश्न काँग्रेसला पडला आहे काय? हा तितकाच नाजूक प्रश्न आहे. प. बंगालात तृणमूल विरुद्ध काँग्रेस लढतील. केरळात डावे विरुद्ध काँग्रेस लढतील. महाराष्ट्रातील महानगरपालिकांत थातूरमातूर कारणांवरून काँग्रेसने स्वतंत्र वाट धरली. त्याचा फायदा भाजपला झाला. आसामात काँग्रेसचे मोठे नेते भूपेन बोरा यांच्या आतल्या आवाजात बंडखोरी दिसत आहे. हे लक्षण बरे नाही. बिहारात राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस एकत्र लढले. राहुल गांधी, तेजस्वी यादव यांनी वातावरण चांगले निर्माण केले. तरीही पदरी अपयश पडले. ‘‘निवडणुका हरलो तरी आम्ही तुम्हाला शरण जाणार नाही व तुमच्या हुकूमशाहीविरुद्ध लढत राहू’’ असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. ‘‘मला संसदेतून काढा नाहीतर माझ्यावर गुन्हा दाखल करा, मला फरक पडत नाही’’ हा राहुल गांधींचा लढवय्या बाणा उत्तम आहे, पण अनेक वर्षे सत्तेशिवाय राहिल्याने कार्यकर्ते, राजकीय पक्षांना जळमटे चढतात व सत्तेवर येण्याची ईर्षा संपून जाते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना बहुमत मिळाले नाही व सरकार कुबड्यांवर चालत असले तरी या सरकारची मनमानी व मस्तवालपणा संपलेला नाही. प्रश्न राष्ट्राचा आहे, तितकाच राजकीय प्रवाहाचा आहे. निवडणुकांच्या घोषणा झाल्या की, ‘इंडिया ब्लॉक’ने जरूर जागे व्हावे व चर्चा कराव्यात, पण त्यापेक्षा जागेपणाने काही निर्णय एकत्र बसून घेण्यातच शहाणपण आहे. मोदी वगैरे लोकांनी जनतेला धर्माची भांग पाजली आहे. त्यामुळे देश प्रे. ट्रम्प यांचा गुलाम बनला आहे हे लोकांना ईश्वरी वरदान वाटत असावे. अशा वेळी लोकांच्या डोळ्यांवरील धार्मिक भांगेची नशा उतरवण्यासाठी काय करावे, हे ठरवायचे कोणी? संसदेतला गोंधळ वेगळा आणि देशातला गोंधळ वेगळा. लोकांचे अंतरात्मे जागरुक होत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ममता, स्टॅलिन की आणखी कोणी? यावर फैसला करावा लागेल!





























































