
2025 सालचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. नाशिक येथे होणाऱया चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा ‘साहित्यभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना प्रदान केला जाणार आहे. प्रत्येकी 10 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. येत्या 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान नाशिक येथे विश्व मराठी संमेलन होणार आहे. संमेलनात राज्य शासनातर्फे विविध पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.
साहित्य निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेला देण्यात येणारा ‘श्री.पु. भागवत’ पुरस्कार नांदेड येथील निर्मल प्रकाशन संस्थेला जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. ‘डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक’ पुरस्कार इचलकरंजी आपटे वाचन मंदिराचे डॉ. दिलीप धोंगडे यांना तर ‘मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक’ पुरस्कार कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे विनोद नारायण कुलकर्णी यांना घोषित झाला. दोन लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
संगीतकार अजय-अतुल यांना ‘कलारत्न’
नाशिक येथे होणाऱया चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात ‘कलारत्न’ पुरस्कार संगीतकार अजय-अतुल गोगावले या जोडीला तर ‘विश्व मराठी संमेलन विशेष’ पुरस्कार आळंदी येथील शांतिब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांना देण्यात येईल. प्रत्येकी पाच लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
श्रीनिवास कुलकर्णी ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची डोह, सोन्याचा पिंपळ, पाण्याचे पंख, कोरडी भिक्षा ही प्रमुख पुस्तके प्रसिद्ध आहेत. मौज प्रकाशन गृह या प्रकशान संस्थेचे प्रकाशक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.























































