
हिंदुस्थानात राहणारे मुस्लिमदेखील हिंदूच आहेत. ते काही अरब देशांतून आलेले नाहीत. त्यांची घरवापसी करायची आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज येथे केले.
हिंदुस्थानवर 500 वर्षे मुघल, 200 वर्षे इंग्रजांनी राज्य केले आणि ते निघून गेले, मात्र हिंदू धर्म संस्कृती ते मिटवू शकले नाहीत. हिंदू धर्माचा पाया भक्कम आहे. त्यामुळेच हिंदू धर्माचे आता कोण काय बिघडवणार, असा प्रश्नही भागवत यांनी विचारला.
हिंदूंनी किमान 3 मुलांना जन्म द्यावा
प्रत्येक हिंदू दांपत्याला तीन अपत्ये असलीच पाहिजेत. सध्या लोकसंख्या दर 2.1 इतका आहे. तो 3 असावा. आता जे कुणी लग्नबंधनात अडकत आहेत त्यांना सांगा, किमान तीन तरी मुले जन्माला घाला, असे भागवत यांनी सांगितले.
कायदा जातींत भांडणे लावणारा नसावा
जातीच्या भानगडीत आपल्याला पडायचे नाही. जात ही अशी गोष्ट आहे जी आपण अनेक दशकांपासून संपवण्याचा प्रयत्न करत आहोत पण ही जात काही जात नाही, असे नमूद करत भागवत यूजीसीच्या गाईडलाईन्सवर बोलले. कायद्याचे पालन सर्वांनाच करावे लागेल. कायदा चुकीचा असेल तर तो बदलता येईल पण कायदा हा जातींमध्ये भांडणाचे कारण ठरू नये, असे मत त्यांनी मांडले.
मुस्लिम समाजाचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण रद्द
राज्यातील मुस्लिम समाजाला देण्यात आलेले पाच टक्के एसईबीसी (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला वर्ग) आरक्षण रद्द करण्यात आले आहे. यामुळे मुस्लिम समाजात मोठा रोष निर्माण होण्याची चिन्हे आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निर्णयाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
























































