
कोकणात गणेशोत्सवाप्रमाणेच लोकप्रिय असलेल्या होळी सणाच्या दिवसांत प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणच्या ओढीने ‘लालपरी’ने होळी सणासाठी तब्बल 198 जादा फेऱयांचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत एसटी प्रशासनाने ‘होळी जादा ऑपरेशन 2026’ अंतर्गत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या विभागांतून 198 जादा फेऱया चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या 27 फेब्रुवारीपासून 5 मार्चपर्यंत ‘लालपरी’ कोकणाच्या दिशेने जोमाने धावणार आहे. ठाणे विभागातून 79 फेऱयांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी 71 फेऱया आगाऊ आरक्षणामुळे पूर्ण क्षमतेने सज्ज झाल्या आहेत. तसेच मुंबई विभागातून 62 फेऱया नियोजित असून त्यापैकी 37 फेऱया आरक्षणाने भरल्या आहेत, तर 25 फेऱया ग्रुप बुकिंगसाठी खुल्या आहेत. पालघर विभागातून 24 फेऱया पूर्णपणे ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून चालवल्या जाणार आहेत. रायगड विभागातून 33 फेऱया आरक्षित प्रवाशांसाठी समर्पित असतील. विशेष मोहिमेत सर्वाधिक गर्दी 28 फेब्रुवारी (91 फेऱया) आणि 1 मार्च (59 फेऱया) या दोन दिवसांत अपेक्षित आहे.
भाईंदर, ठाणे, पनवेलहून एसटी बस
होळी, शिमगा उत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी दरवर्षीप्रमाणे 1 ते 10 मार्च या कालावधीत भाईंदर, ठाणे, महाड कावळेगाव विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. आरक्षणाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध असून भाईंदर ते कावळेगाव रिजर्व्हेशन हवे असल्यास Bydr To Kag असे टाईप करावे. ठाणे सीबीएस ते कावळेगाव रिजर्व्हेशन हवे असल्यास Thncbs-Thane To Kag असे टाईप करावे. तसेच पनवेल ते कावळेगाव रिजर्व्हेशन हवे असल्यास Pnl To Kag असे टाईप करावे. होळीनिमित्त कोकणात जाणाऱया भाईंदर, ठाणे, पनवेलमधील चाकरमान्यांनी या एसटी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय विमा कर्मचारी सेना मुंबई क्षेत्रीय कार्यालय 3 चे अध्यक्ष, श्री देवी काळकाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे सरचिटणीस विनोद येरुणकर यांनी केले आहे.
























































