धक्कादायक निष्कर्ष! अजितदादांच्या विमान अपघातात आगीमुळे दोन्ही रेकॉर्डर जळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या विमान अपघातात निधन झाले, तेव्हापासून त्यांच्या मृत्यूविषयी संशय व्यक्त केला जात आहे. आता विमानाला लागलेल्या आगीमुळे विमानातील दोन्ही रेकॉर्डर जळाल्याचा धक्कादायक निष्कर्ष सरकारी तपास यंत्रणेने काअसून, त्यावर दोन्ही राष्ट्रवादीतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

विमान अपघात तपास शाखेकडून (एएआयबी) या दुर्घटनेची चौकशी केली जात असून एएआयबीने प्रथमच अधिकृतरीत्या तपासाबाबत माहिती दिली आहे. त्यात ब्लॅक बॉक्सचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ‘विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. अपघातादरम्यान दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर बराच काळ तीव्र उष्णतेच्या संपका&त होते आणि आगीमुळे त्यांचे नुकसान झाले’, असे एएआयबीच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

विमानाचा डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) एएआयबीच्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचीही तपासणी सुरू आहे. त्यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी निर्माता पंपनीशी संपर्क साधण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

चौकशीचा अहवाल राज्य सरकारलाही देणार

नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांनी चौकशीचा अहवाल महाराष्ट्र सरकारलाही दिला जाईल असे म्हटले आहे. पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने तपास होईल. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य अपेक्षित आहे, असे नायडू म्हणाले.

ब्लॅकबॉक्स केव्हा नष्ट होऊ शकतो?

अपघातानंतर लागलेली आग जर 1100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची असेल आणि ती 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली तर ब्लॅक बॉक्समधील फ्लॅश मेमरी उष्णतेमुळे खराब होऊ शकते. अत्यंत जोराचा धक्का बसल्यासही यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते. समुद्रात दीर्घकाळ खारट पाण्यात राहिल्यास त्याला गंज लागून डाटा नष्ट होण्याची शक्यता असते. पण ब्लॅक बॉक्स 30 दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करेल असा डिझाइन केलेला असतो, असे मिटकरी यांनी सांगितले.

विमानाची शेपूट सुरक्षित, मग ब्लॅक बॉक्स कसा जळला?

अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर बोट ठेवत अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटामध्ये असतो. अपघात होतो त्यावेळी अनेकदा असे निदर्शनास आलेय की, विमानाची शेपूट पूर्णपणे जळत नाही. त्यामुळेच ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटामध्ये ठेवला जातो. दादांच्या विमानाचे शेपूटही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ते अजिबात जळालेले नाही. त्यामुळे ब्लॅक बॉक्सला नुकसान होण्याचा संबंधच येत नाही. ब्लॅक बॉक्स असा बनवलेला असतो की, हाय टेम्परेचरमध्येही तो सुरक्षित राहतो. कितीही मोठी आग लागली तरीही तो जळून खाक होत नाही, मग अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला, असा सवाल मिटकरी यांनी केला.

पायलटचा ‘त्या’ दिवसाचा दिनक्रम जाहीर करा

अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या विमानाच्या पायलटचा दिनक्रम जाहीर करण्याचीही मागणी केली आहे. आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार असे समजते. तोपर्यंत विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. पायलट साहिल मदन, यश, सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कोणत्या गाडीतून निघाले? कोणत्या रोडवर ट्रफिकमध्ये अडकले? त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व सर्व पायलटचा 28 जानेवारी 2026 रोजीचा दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्या, अशी विनंतीही मिटकरी यांनी केली आहे.

अजित पवार गटाकडून सीबीआय चौकशीची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अजित पवार गटाकडून आज करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, पार्थ पवार यांनी या मागणीचे निवेदन दिले.