
धावत्या ठाणे-कल्याण लोकलमध्ये खुलेआम गर्दुल्ले नशा करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून दोन नशेडी खुलेआम लोकलमधील डब्यात एका कोफ्ऱ्याला बसून नशा करताना दिसत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही लोकल आहे की गुर्दुल्ल्यांचा अड्डा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईची लाईफलाईन आता गुन्हेगारी आणि नशेखोरांचा अड्डा बनत चालली आहे. ठाण्याहून दुपारी कल्याणच्या दिशेने लोकल सुटली. या लोकलमध्ये दोन नशेखोर खुलेआम अमली पदार्थाचे सेवन करताना आढळले. सहप्रवाशांनी याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे या नशेडींना पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे समोर आले आहे. या ट्रेनमध्ये असंख्य प्रवासी होते मात्र यातील एकानेही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. गर्दुल्ल्यांनी एखाद्या प्रवाशावर हल्ला केला असता तर याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रवास करायचा तरी कसा?
कामावर जाण्यासाठी सर्वसामान्य प्रवासी अनेक दिव्य पार करून रोज प्रवास करीत असतात. लोकलमध्येही गर्दुल्ले घुसत असतील तर सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवास करायचा तरी कसा, असा संतप्त सवाल प्रवासी संघटनेचे पदाधिकारी राजेश घनघाव व नंदकुमार देशमुख यांनी केला आहे.
स्टेशन मास्तरांना घटनेची माहितीच नाही
प्रत्येक स्थानकावर आणि रेल्वे गाड्यांमध्ये गस्त घालण्याचा दावा रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून केला जातो. मात्र भरदिवसा लोकलमध्ये गर्दुल्ले नशा करत असताना सुरक्षारक्षक कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत ठाणे स्टेशन मास्तर अपर्णा देवधर यांच्याशी संपर्क साधला असता या घटनेची कोणतीच माहिती नसल्याचे अजब उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कायमस्वरूपी गस्त वाढवा
ठाणे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रकारांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाने गर्दुल्ल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. केवळ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जाग येण्यापेक्षा रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी गस्त वाढवावी आणि अशा गुन्हेगारांना चाप लावावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.























































