
बारामती येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून या प्रकरणाच्या चौकशीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले आणि केवळ कागदी पुराव्यांवर विसंबून न राहता डिजिटल पुराव्यांची मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी अपघाताच्या तांत्रिक बाबींकडे लक्ष वेधत सांगितले की, विमानाचे इंधन टँक पूर्णपणे भरलेले असण्याची काहीही गरज नव्हती, तरीही ते का भरले होते? असा प्रश्न त्यांनी विचारला. पायलटाचा वापर करून हे विमान जाणीवपूर्वक पाडले गेले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विशेषतः ब्लॅक बॉक्स खराब झाल्याच्या दाव्यावर त्यांनी तांत्रिक आव्हान दिले. तज्ज्ञांच्या मते ब्लॅक बॉक्स 11000 अंश सेल्सिअस तापमानात एक तास जळला तरच खराब होऊ शकतो. विमानातील ज्या केबल्सचे मेल्टिंग पॉइंट कमी होते त्या सुरक्षित असताना, ब्लॅक बॉक्स कसा काय खराब झाला? असा सवाल करत त्यांनी यामागे काहीतरी लपवले जात असल्याचा संशय व्यक्त केला.
विमानाच्या आर्थिक बाबींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, विमानाची अवस्था अत्यंत खराब होती. विमानाचा विमा 55 कोटी रुपये असताना त्याची लायबिलिटी 210 कोटी रुपये होती, ही बाब संशयास्पद आहे. विमानाची बॉडी ॲल्युमिनियमची आणि बाहेरील भाग टायटॅनियमचा असल्याने तांत्रिक त्रुटी लपवणे कठीण आहे, तरीही कागदपत्रांमध्ये फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणांच्या कामावर आपण समाधानी असलो तरी तपासाचा संथ वेग संशय वाढवणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. आता राजकीय नेतेही या संदर्भात पत्रे लिहून चौकशीची मागणी करत असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर यायला हवे, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली आहे.































































