
म्हाडा मुंबई मंडळातर्फे ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी मंगळवारपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच लॉटरीशिवाय घर घेण्याची संधी मिळणार आहे. अर्जदाराने मनपसंत घराची निश्चिती केल्यानंतर घराच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम 48 तासांत ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार आहे. रक्कम भरल्यानंतर अर्जदाराला तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल. अर्जदाराने 48 तासांच्या आत 10 टक्के रक्कम न भरल्यास घरावरील दावा रद्द होणार आहे तसेच अर्जदाराने भरलेली अनामत रक्कम जप्त होणार आहे.
या योजनेतील सर्वात कमी किमतीचे घर पीएमजीपी कॉलनी, मानखुर्द येथे असून या घराची किंमत 31 लाख रुपये आहे तर सर्वात महागडे घर ताडदेव क्रिसेंट टॉवरमध्ये असून या घराची किंमत 8 कोटी रुपये आहे. अर्जदाराला योजनेनुसार एक लाख रुपयांपासून ते सहा लाख रुपयांपर्यंत अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
90 दिवसांत उर्वरित रक्कम भरावी लागणार
अर्जदाराला तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर पुढील 90 दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीत रक्कम न भरल्यास आणखी 90 दिवसांची मुदतवाढ घेऊन नियमानुसार व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे. तरीही पैसे न भरल्यास घराचे वितरण रद्द करण्यात येईल. तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर एखाद्या अर्जदाराने घर नाकारले तर घराच्या विक्री किमतीच्या 1 टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम अर्जदाराला परत करण्यात येईल.

























































