
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गलगोटिया विद्यापीठाच्या या बनावट रोबोटिक डॉगची पोस्ट केली होती. सत्य उजेडात आल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की मंत्रीमहोदयांवर ओढवली. मुळात अश्विनी वैष्णव हे स्वतः आयआयटीयन आहेत. शिवाय या आंतरराष्ट्रीय एआय संमेलनाचे अध्यक्षही तेच आहेत आणि तेच वैष्णव चीनचा रोबोटिक डॉग भारताचा म्हणून सांगतात आणि तोंडावर पडतात हे लाजिरवाणे आहे. यामुळे केवळ सरकारचेच नव्हे, तर देशाचे जगभरात हसू झाले. एआय समिटच्या इव्हेंटने आत्मनिर्भरतेच्या पोकळ गप्पांचे जागतिक पातळीवर धिंडवडे निघाले.
मोदी सरकार आणि इव्हेंट हे समीकरणच झाले आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनाही कायम याच समीकरणात राहायला आवडते. त्यामुळे कार्यक्रम किंवा उपक्रम कोणताही असला तरी त्यांचा त्यातील वावर हा उत्सवी किंवा इव्हेंट स्वरूपाचाच असतो. नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट, 2026’ या जागतिक प्रदर्शनामध्येही वेगळे चित्र दिसले नाही. त्यामुळे जे आधीच्या सरकारपुरस्कृत ‘इव्हेंट’चे झाले तेच या ‘एआय समिट’चेही झाले. करायला गेलो एक आणि झाले भलतेच, अशीच गत या उत्सवाचीही झाली आहे. जागतिक पातळीवर वाहवा वगैरे तर दूरच, परंतु गलगोटिया विद्यापीठाने केलेली बनवाबनवी उघड झाल्याने जगात भारताची बेअब्रूच झाली. या ‘समिट’चा पहिला दिवस नियोजनातील गोंधळामुळे गाजला. दुसरा दिवस भारताच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उमटविणारा ठरला. दिल्लीतीलच गलगोटिया विद्यापीठाने केलेली बनावटगिरी चव्हाट्यावर आल्याने सरकारचीच नव्हे, तर देशाची इभ्रत धुळीला मिळाली. या विद्यापीठाने एआयआधारित रोबोटिक डॉग आपण विकसित केल्याचा दावा करून प्रदर्शनात ठेवला होता. मात्र प्रत्यक्षात हा डॉग चिनी बनावटीचा असल्याचे नंतर उघड झाले. या प्रकरणाचा धुरळा खाली बसलेला नसतानाच याच विद्यापीठाने सादर केलेला ‘सॉकर ड्रोन’देखील वादाच्या भोवऱ्यात सापडला. हा ड्रोनही प्रत्यक्षात दक्षिण कोरियन कंपनी हेलसेल ग्रुपने विकसित केल्याचे स्पष्ट झाले. या विद्यापीठाच्या प्रतिनिधींची नंतर तेथून हकालपट्टी वगैरे केली गेली, परंतु केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान
मंत्रालयाची ही कारवाई
म्हणजे ‘बैल गेला नि झोपा केला’ अशीच म्हणावी लागेल. मोदी कसे दूरदृष्टीचे नेते आहेत, त्यांच्यामुळे देश कशी ‘डिजिटल भरारी’ घेत आहे, असे फुगे मोदीभक्त या समिटच्या निमित्ताने हवेत सोडत होते. अर्थात ते हवेतच फुटल्याची खंत ना त्यांना आहे, ना मोदींना. उलट जगभरातील एआय कंपन्यांच्या सीईओंसमोर त्यांनी ‘‘एआय हे नैतिक मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असले पाहिजे’’ असे प्रवचन झोडले. त्यासाठी भारताचे ‘M-A-N-A-V’ म्हणजे ‘मानव व्हिजन’देखील सादर केले. ‘एम’ म्हणजे मॉरल, ‘ए’ म्हणजे अकाऊंटेबल गव्हर्नन्स, ‘एन’ म्हणजे नॅशनल सॉव्हरिन्टी (सार्वभौमत्व), ‘ए’ म्हणजे अॅक्सेसेबल आणि ‘व्ही’ म्हणजे व्हॅलिड, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे हे विचार मौलिक असले तरी एका भारतीय विद्यापीठानेच या प्रदर्शनातच त्यांना मूठमाती दिली त्याचे काय? मोदी मोठमोठ्या बाता नेहमीच करतात, मोठमोठे दिवेही लावतात. मात्र त्या प्रत्येक दिव्याखाली नेहमी अंधारच असतो. गाजावाजा केलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’च्या दिव्याखालीही गलगोटिया विद्यापीठाच्या बनावटगिरीने अंधारच पसरला आहे. आपण प्रत्येक क्षेत्रात ‘धुरंधर’ आहोत, जगात जे ‘वारं’ जोरात फिरत असते त्यावर आपण स्वार होऊ शकतो हे दाखविण्याची एकही संधी मोदी सोडत नाहीत. त्यातूनच ‘एआय’ नावाच्या सध्याच्या जागतिक वाऱ्यावर स्वार होत आपले
घोडे दामटविण्याचा
प्रयत्न मोदी यांनी केला. त्यासाठी ‘एआय महाकुंभ’ भरविण्याचा खटाटोप केला. एआय हे वर्तमान आणि भविष्य असल्याने हा खटाटोप करायला हरकत नव्हती, परंतु गलगोटिया विद्यापीठाच्या बनावटगिरीने जगभरात भारताची ‘छीथू’ झाली त्याचे काय? त्यासाठी फक्त विद्यापीठाकडे बोट दाखवून सरकारला हात झटकता येणार नाहीत. या समिटमुळे जागतिक एआय क्षेत्रात भारताची किती ताकद दिसली, हा नंतरचा प्रश्न; पण बनावट रोबोटिक डॉग आणि सॉकर ड्रोन प्रकरणाने हा एआय महाकुंभ म्हणायचा की मोदी सरकारचा नेहमीचा गोलमाल, या प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे लागेल. मोदी सरकार ते देऊ शकणार आहे का? पुन्हा आश्चर्य असे की, खुद्द केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गलगोटिया विद्यापीठाच्या या बनावट रोबोटिक डॉगची पोस्ट केली होती. सत्य उजेडात आल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्याची नामुष्की मंत्रीमहोदयांवर ओढवली, पण तोवर भारताची जी आंतरराष्ट्रीय बेइज्जती झाली त्याचे काय? मुळात अश्विनी वैष्णव हे स्वतः आयआयटीयन आहेत. शिवाय या आंतरराष्ट्रीय एआय संमेलनाचे अध्यक्षही तेच आहेत. तेच वैष्णव चीनचा रोबोटिक डॉग भारताचा म्हणून सांगतात आणि तोंडावर पडतात हे लाजिरवाणे आहे. यामुळे केवळ सरकारचेच नव्हे, तर देशाचे जगभरात हसू झाले. एआय समिटच्या इव्हेंटने आत्मनिर्भरतेच्या पोकळ गप्पांचे जागतिक पातळीवर धिंडवडे निघाले. भारताच्या या बेअदबीचे मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव काय प्रायश्चित्त घेणार आहेत?































































