
चोरी करणाऱ्या केअर टेकर तरुणीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. सपना चौधरी असे तिचे नाव आहे.
तक्रारदार महिला या व्यावसायिक आहेत. त्यांच्या सासूवर शस्त्रक्रिया झाल्याने आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी एका कंपनीच्या माध्यमातून तिला कामावर ठेवले होते. नुकतीच ती कामाला त्यांच्याकडे लागली होती. तक्रारदार यांनी त्यांचे सोन्याचे दागिने लाकडी कपाटात ठेवले होते. दुसऱया दिवशी त्यांना दागिने आढळून आले नाहीत. त्यांनी दागिन्यांचा शोध घेतला. मात्र दागिने कुठेच सापडले नाहीत. दागिने चोरीप्रकरणी त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी सपनाला ताब्यात घेतले. तिला अटक करून न्यायालयात हजर केले.
डेबिट कार्डची अदलाबदल करून वृद्धांची फसवणूक
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाणाऱया वृद्धांना टार्गेट करून कार्डची अदलाबदली करत फसवणूक करणाऱयाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. फ्रान्सिस पॅट्रिक फर्नांडिस असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने तीन गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 71 कार्ड जप्त केले आहेत.
तक्रारदार हे बोरिवली येथे राहतात. 7 फेब्रुवारीला ते बोरिवली येथील एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढत असताना एक जण त्याच्याजवळ आला. त्याने पैसे काढण्यास मदत करतो असा बहाणा केला. बहाणा करून त्यांचा पासवर्ड घेतला. त्याने संधी मिळताच एटीएम कार्डची अदलाबदल केली.
हातसफाई करून नोकर पसार
वृद्धाच्या घरी नोकराने हातसफाई करून पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा नोंद केला आहे. नोकर हा पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तक्रारदाराने त्याच्या मित्राच्या माध्यमातून कामासाठी घरगडी ठेवला होता. पाच दिवसांपूर्वी तक्रारदार हे रात्री जेवण करून झोपले. दुसऱया दिवशी ते झोपेतून उठले. तेव्हा त्याना नोकर घरात दिसला नाही. त्यामुळे त्यांनी रूमची पाहणी केली तेव्हा त्यांना त्यांच्या बॅगेतून मोबाईल, बँकेची कार्ड आढळली नाहीत. त्यांच्या क्रेडिटकार्डवरून 9 लाख 90 हजार रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलिसांनी नोकराविरोधात गुन्हा नोंद केला.
अल्पवयीन मुलाला गाडी देणे पडले महागात
मुलगा अल्पवयीन असल्याचे माहीत असूनदेखील त्याला वाहन चालवण्यास देणे पित्याला महागात पडले. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी पित्याविरोधात गुन्हा नोंदवला.
बुधवारी सायंकाळी तक्रारदार जरीमरी, साकीनाका जंक्शन येथे रायडर म्हणून गस्त करत होते. सायंकाळी त्यांना अधिकाऱयाचा फोन आला. मरोळ नाका ते साकीनाका जंक्शन येथे एक अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात वाहन चालवत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन वाहतूक चौकीत आणले. त्यानंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांनी वाहतूक चौकीत बोलावले. त्याच्याकडे कागदपत्राची मागणी केली तेव्हा तो मुलगा अल्पवयीन असल्याचे उघड झाले.



























































