Thane crime news – येऊरमध्ये नशेचा बाजार गरम, 11 लाखांचे कोकेन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गरम्य येऊरमधील अलिशान बंगले, फार्म हाऊसेस, हॉटेल्स, रिसॉर्टस्मध्ये नशेचा बेधुंद बाजार सुरू असल्याची घटना समोर आली असून येथील ग्राहकांना सप्लाय करण्यासाठी आलेल्या ड्रग्ज पेडलरकडून ११ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. ठाण्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली. इम्रान चौधरी असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरचे नाव असून त्याच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील अत्यंत निसर्गरम्य टेकडी असा येऊरचा लौकिक आहे. या येऊरमध्ये अनेक धनाढ्यांचे बंगले, रिसॉर्ट, हॉटेल आणि फार्म हाऊसेस आहेत. पर्यटकांनी येऊर नेहमीच हाऊसफुल्ल असते. येथे येणाऱ्या पर्यटकांना ड्रग्जही सप्लाय करण्यात येत असल्याच्या तक्रारी अमली पदार्थविरोधी पथकाकडे आल्या होत्या. कुर्ला येथून किमती ड्रग्ज घेऊन एक अलिशान कार येऊरला येणार असल्याची खबर या पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली. त्यानुसार सायंकाळी पावणेचार वाजण्याच्या सुमारास येऊरमध्ये सापळा रचण्यात आला. स्वानंदबाबा आश्रमाच्या लायन पार्कसमोर ही कार येताच त्यातील संशयितांवर पोलिसांनी झडप घातली. यावेळी इम्रान चौधरी या ड्रग्ज पेडलरकडून ८ लाख ८० हजार रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले तसेच २ लाख रुपये किमतीचे तीन मोबाईलही हस्तगत करण्यात आले. इम्रान चौधरी हा कुर्य्यात भंगार विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले.