फुटबॉल खेळताना शिलाँगचे खासदार रिकी एजे सिंग्कॉन कोसळले, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेघालयाच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. ‘वॉईस ऑफ द पीपल पार्टी’चे (VPP) शिलाँगचे खासदार रिकी एजे सिंग्कॉन यांचे गुरुवारी सायंकाळी फुटबॉल खेळत असताना मैदानात कोसळले. त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिकी एजे सिंग्कॉन हे गुरुवारी सायंकाळी मावलाई मावियोंग येथील एका क्रीडा संकुलात आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. खेळादरम्यान ते अचानक मैदानावर कोसळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी मावियोंग सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तिथे वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने जाइआव येथील डॉ. एच. गॉर्डन रॉबर्टस रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. रात्री 8.42 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिकी एजे सिंग्कॉन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे सलग तीन वेळा खासदार राहिलेले दिग्गज नेते विन्सेंट एच. पाला यांचा 3.7 लाखांहून अधिक मतांनी पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

एक तळागाळातील नेता आणि आदिवासी हक्कांचे पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख होती. पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठवला. त्यांच्या अकाली जाण्याने मेघालयच्या राजकारणात आणि विशेषतः व्हीपीपी पक्षात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.