हिंदुस्थान-अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसचे ‘किसान संमेलन’, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात यवतमाळमध्ये होणार सभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार करारावरून (Indo-US Trade Deal) आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या कराराला कडाडून विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने ‘किसान संमेलन’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील यवतमाळ येथे भव्य शेतकरी सभा होणार असून, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या सभेला संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर सरेंडर केल्याचा आरोप केला आहे. या व्यापार करारामुळे हिंदुस्थानातील कापूस, सोयाबीन, मका आणि फळबागायतदार शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गदा येणार असल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केली आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या सहा राज्यांतील शेतकऱ्यांवर याचा सर्वाधिक नकारात्मक परिणाम होईल, असे जयराम रमेश म्हणाले आहेत.

यावेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, २४ फेब्रुवारी रोजी पहिले किसान संमेलन मध्य प्रदेशातील भोपाळ येथे होईल. ७ मार्च रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ येथे दुसरे मोठे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. तसेच तिसरे संमेलन राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे पार पडेल.