हिंदुस्थानी लष्कराला मोठे यश; जम्मू-कश्मीरमध्ये AK-47 सह दारूगोळ्याचा साठा जप्त; दहशतवाद्यांचा कट उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये हिंदुस्थानी लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त शोध मोहिमेतदहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेच्या (LoC) जवळ असलेल्या या भागात लष्कराला एके-४७ रायफलसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा सापडला असून, परिसरात रक्ताने माखलेले पाऊलखुणाही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरबनी सेक्टरमधील जंगलात काही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. या शोध मोहिमेदरम्यान एका लपविलेल्या ठिकाणाहून एक एके-४७ (AK-47) रायफल, मोठ्या प्रमाणात काडतूसं आणि मॅगझिनसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

या मोहिमेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी आणि त्याच्या आसपास रक्ताने माखलेले पाऊलखुणा सापडल्या आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत किंवा घुसखोरीच्या प्रयत्नात एखादा दहशतवादी गंभीर जखमी झाला असावा आणि तो जंगलाचा फायदा घेऊन पळून गेला असावा.

रक्ताचे ठसे ज्या दिशेने गेले आहेत, त्या संपूर्ण वनक्षेत्रात लष्कराने ड्रोन आणि स्निफर डॉग्सच्या मदतीने शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. जखमी दहशतवादी जवळच्याच परिसरात दडून बसला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.