हार्बरवर एसी लोकलच्या 14 फेऱ्या वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावरील वातानुकूलित (एसी) लोकल ट्रेनच्या फेऱया वाढवण्यात येणार आहेत. पुढील एक-दोन महिन्यांतच मध्य रेल्वेच्या ताफ्यात दोन नव्या एसी गाडय़ा (रेक) दाखल होणार आहेत. त्यातील एक ट्रेन प्राधान्याने हार्बरवर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर एसी ट्रेनच्या आणखी 14 फेऱ्यांची भर पडणार आहे.

हार्बर मार्गावर प्रजासत्ताक दिनापासून पहिली एसी लोकल प्रवासी सेवेत धावत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल मार्गावर सोमवार ते शनिवारी दररोज एसी लोकलच्या 14 फेऱया धावतात. एसी ट्रेनमधून 16 दिवसांत साडेसहा लाखांवर प्रवाशांनी प्रवास केला. हा वाढता प्रतिसाद लक्षात घेत मध्य रेल्वेने हार्बरवर आणखी एक एसी ट्रेन दाखल करण्याचे नियोजन सुरू केले आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात पुढील दोन महिन्यांत दोन एसी ट्रेन दाखल केल्या जाणार आहेत. 12 डब्यांच्या या लोकल चेन्नईच्या फॅक्टरीतून येणार आहेत. यामुळे मेन आणि हार्बर मार्गावरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या 25 ते 26 ने वाढणार आहे. यापैकी 14 फेऱया प्राधान्याने हार्बर मार्गावर चालवण्याचा प्रशासनाचा मानस आहे.