‘बेस्ट’ पगारवाढीसाठी ‘वर्षा’वर मोर्चा, कामगार सेना आक्रमक भूमिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रम तसेच बेस्ट कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि बेस्ट व्यवस्थापनाशी तीव्र लढा देण्याची तयारी बेस्ट कामगार सेनेने केली आहे. बेस्टमधील कामगारांच्या पगारवाढीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, विधिमंडळ सभागृहात आवाज उठवणार तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर भव्य मोर्चा नेणार, असा इशारा बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी शुक्रवारी दिला.

शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेची कार्यकारिणी बैठक शिवसेना भवन येथे पार पडली. यावेळी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, बेस्ट कामगार सेनेचे प्रमुख मार्गदर्शक गौरीशंकर खोत, सरचिटणीस तथा नवनिर्वाचित बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर, नगरसेवक सुनील मोरे, नगरसेविका स्नेहल शिवकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल किशोरी पेडणेकर तसेच नवनिर्वाचित बेस्ट समिती सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. बैठकीत अहिर यांच्यासह गौरीशंकर खोत, नितीन नांदगावकर, सुनील मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना बेस्ट वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा शब्द उपस्थित कार्यकारिणी सदस्यांना दिला. बेस्टला सर्वच बाजूंनी पोखरण्याचे कारस्थान सुरू आहे. बेस्ट उपक्रम वाचवण्यात ना व्यवस्थापकांना स्वारस्य, ना सरकारला. तथापि, उपक्रम आणि सर्वच कामगारांचे प्रश्न सोडवण्याच्या हेतूने मुख्यमंत्री आणि व्यवस्थापन जेरीस येईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचा निर्धार खोत यांनी व्यक्त केला. सचिन अहिर यांनी अदानीच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधातही आवाज उठवणार असल्याचे जाहीर केले.

कंत्राटदारांविरुद्धखळ्ळखट्याक

बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटदारांच्या गाडय़ांचे अपघात होत आहेत. या माध्यमातून कंत्राटदार बेस्ट कर्मचाऱयांच्या आणि प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. हे गंभीर असून मुजोर कंत्राटदारांना ताळ्यावर आणण्यासाठी आणि संवेदनाशून्य प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रसंगी कंत्राटदारांच्या मुख्य कार्यालयांच्या काचा फुटतील, असा गर्भित इशारा नितीन नांदगावकर यांनी दिला.

आम्ही चोरूनबाळकडू
घेतलेले नाही!

पालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱयांच्या कारस्थानाचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ‘बाळकडू’ घेतलेले निष्ठावंत शिवसैनिक आहोत. चोरून ‘बाळकडू’ घेतलेले नाही, तर उघडपणे घेतले. त्यामुळे आम्ही कुणाच्याही आमिषाला बळी पडणारे नाहीत. मागील संघर्षाच्या काळात डगमगलेलो नाही. विरोधकांचे कारस्थान खंबीरपणे उलथवून लावू, असे किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधाऱयांना ठणकावले.

किशोरी पेडणेकर