नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा! रोहित पवार यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि दिवंगत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे रोहित पवार म्हणाले. शनिवारी रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत व्हीएसआर कंपनीबाबतही अनेक धक्कादायक दावे केले. यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातील लोक प्रयत्न करत आहेत. पण तपासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच न्याय देऊ शकतात. कारण यात सहभागी लोक पॉवरफूल आहेत, असे रोहित पवार म्हणाले. तसेच व्हीएसआर कंपनीबाबत अनेक तक्रारी असून विमानतळावरील सीसीटीव्हीची मागणीही फेटाळून लावण्यात आली आहे. या कंपनीला काही प्रभावशाली लोकांचा पाठींबा आहे. विमानात जाणीवपूर्वक इंधनाचा मोठा साठा ठेवण्यात आला होता, असा आरोपही रोहित पवारांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले की, आमच्या पातळीवर आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहोत. अजितदादांवर प्रेम करणारे जे लोक आहेत, त्यांनी विमानतळावरील सीसीटीव्हीबद्दल माहिती मागितली होती, पण ती देण्यात आली नाही. तपासकर्त्यांकडे ती माहिती आहे की नाही हे माहित नाही. सीआयडीने एकही रिपोर्ट दिलेला नाही. सरकारच्या माध्यमातून माहिती मिळालेली नाही. माहिती आमच्या लोकांना मिळत नाही. पण भाजप पुरस्कृत ट्रोलर्सना एअरपोर्ट ऑथोरिटीच्या माध्यमातून सहज मिळत आहे.

अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सीआयडीमार्फत होत आहे. मात्र पारदर्शक तपासासाठी यावरही एक समिती असावी अशी आमची मागणी आहे. यात विरोधी पक्षनेते, सुप्रिया सुळे, अजितदादांच्या पक्षातील लोकं, एक न्यायाधीश आणि अधिकारी यांचा समावेश असावा आणि त्यांच्या देखरेखेखाली सीआयडी किंवा सीबीआय चौकशी व्हावी. त्यांना अंतिम रिपोर्टसाठी दोन महिन्यांचा वेळ देण्यात यावा. व्हीएसआर कंपनीमागे मोठी ताकद असल्याने या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न मोठे उद्योजक आणि राजकारणी करू शकतात, असे रोहित पवार म्हणाले.