
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. पंतप्रधान पुन्हा एकदा शरणागती पत्करणार अशी टीका राहुल गांधी यांनी केली. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दणका दिला. राष्ट्राध्यक्षांना असे टॅरिफ लावण्याचा अधिकारच नाही, हे बेकायदेशीर आहे, असे खडे बोल सुनावत न्यायालयाने हिंदुस्थानसह जगभरातील अनेक देशांवर ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ रद्द केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अवघ्या काही तासांमध्ये ट्रम्प यांच्या कार्यालयाने नव्या आदेशावर स्वाक्षरी केली असून या आदेशानुसार आता जगातील सर्व देशांमधून आयात होणाऱ्या सामानावर 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला.
याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला. पंतप्रधानांनी तडजोड केली असून त्यांची फसवणूक आता उघड झाली आहे. ते पुन्हा वाटाघाटी करू शकत नाहीत. ते पुन्हा एकदा शरणागती पत्करणार, अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली.
The PM is compromised.
His betrayal now stands exposed.He can’t renegotiate.
He will surrender again.— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 21, 2026
हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावरून राहुल गांधी यांनी याआधीही केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान लोकसभेत केलेल्या भाषणातही राहुल गांधी यांनी मोदींवर हल्ला चढवला होता. पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शरणागती पत्करली आणि 140 लोकांचे भविष्य पणाला लावल्याचा आरोप केला होता. या व्यापार करारामुळे हिंदुस्थानातील शेतकरी, वस्त्रोद्योग उद्ध्वस्त झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
देश विकताना लाज वाटली नाही का? राहुल गांधींचा मोदी सरकारवर थेट हल्ला




























































