
प्रचंड गरिबी, व्यसनाधीन नवरा… पोटाची खळगी कशी भरणार? मुलांचे संगोपन कसे करणार? या विवंचनेतून एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांना 40 हजार रुपयांत विकले. ही धक्कादायक घटना मिरज येथे उघडकीस आली. एका मुलाला माधवनगरात तर दुसऱयाला कर्नाटकात विकले. संतापजनक म्हणजे या मुलांची विक्री करण्यासाठी महापालिकेतील प्रसूती विभागातील महिला कर्मचारी शिपाई सुरेखा चंद्रकांत लोंढे हीने मदत केली. याप्रकरणी लोंढेसह संबंधित महिला, मुलांना विकत घेणारा माधवनगरातील सचिन गोसावी, एजंट सचिन लोंढे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, संबंधित महिलेच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. अनाथ झाल्यानंतर ती भंगार विक्री-कचरा वेचक म्हणून काम करीत होती. तिचा रोहित नामक तरुणासोबत प्रेमविवाह झाला. त्यांना दोन मुले एक मुलगी अशी अपत्ये झाली. पती रोहित व्यसनी आहे. गरिबीमुळे मुलांचे संगोपन अवघड झाले होते. त्यातून तिने मुलांना विकण्याचा निर्णय घेतला. तिची प्रसूती मिरजेतील महापालिकेच्या दवाखान्यात झाली होती. तिथे ती सुरेखा हिच्या संपर्कात ती आली होती. त्यानंतर सुरेखा आणि सचिन लोंढे यांनी 2024 मध्ये तीन अपत्यांपैकी एका मुलाला कर्नाटकात दत्तक म्हणून विकले. त्यासाठीची दत्तक प्रक्रियाही बेकायदेशीर केली.
























































