
श्री भगवती देवी मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाचा पारंपरिक शिमगा उत्सव धार्मिक वातावरणात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.शिमगा उत्सवाची रूपरेषा नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत निश्चित करण्यात आली. या बैठकीस देवस्थानचे विश्वस्त, समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सवाची सुरुवात रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी देवीला रूपे चढविण्याच्या कार्यक्रमाने होणार असून त्यानंतर निशाणी काठी उभारण्यात येणार आहे. याच दिवशी (षष्टी) दुपारी ३.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत पारंपरिक पालखी व हातभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री भगवती देवी मंदिर येथून पालखी प्रस्थान करून भागेश्वर मंदिर, राम मंदिर मार्गे श्री देव भैरव येथे हातभेट देण्यात येईल. पुढे मुरलीधर मंदिर, झाडगाव नाका मार्गे जोगेश्वरी मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर नवलाई-पावणाई मंदिर तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे परिसरातील श्री देव महापुरुष मंदिर येथे गाऱ्हाणे घालून पालखी सायंकाळी पुन्हा मंदिरात परत येणार आहे.
सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी होळी उत्सव साजरा करण्यात येणार असून दुपारी १.३० वाजता मंदिरातून होळी मिरवणूक निघेल. भागेश्वर मंदिर, राम मंदिर, मांडवी बंदर मार्गे विविध ठिकाणी पारंपरिक होळी तोडण्याचा विधी पार पडणार आहे. भुते नाका, मुरलीधर मंदिर परिसर, भैरी मंदिर, सुबेदार नाका (चरकरवाडी) मार्गे मिरवणूक रात्री ११ वाजता श्री भगवती मंदिर येथे परतल्यानंतर होम विधी संपन्न होईल.
मंगळवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी धुळीवंदन कार्यक्रम दुपारी १.३० ते रात्री ८.०० या वेळेत पार पडणार आहे. भगवती मंदिर, भागेश्वर मंदिर, पेठकिल्ला, राम मंदिर, चरकर होळदेव, भैरव मंदिर, काँग्रेस भवन, टिळक आळी, झाडगाव नाका, जोगेश्वरी मंदिर आदी मार्गांवर पारंपरिक फेरी काढण्यात येणार असून उत्सवाची सांगता मंदिरात होणार आहे.


























































