
इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच घरात जबर धक्का दिला आहे. पल्लीकल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं. इंग्लंडने श्रीलंकेला जिंकण्यासाठी 146 धावांचे माफक आव्हान दिले होते. मात्र, इंग्लंडच्या घातक माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव अवघ्या 95 धावांमध्येच संपुष्टात आला आणि इंग्लंडने 51 धावांनी मोठा विजय साजरा केला.
नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा केल्या आणि श्रीलंकेला 147 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडकडून फिल सॉल्टने सर्वाधिक 62 धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, मधली फळी ढेपाळल्याने संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपल्या तालावर अक्षरश: नाचवलं. कर्णधार दासुन शनाका (30) व्यतिरिक्त इतर एकाही फलंदाज मैदानावर टीकू शकला नाही. व्हिल जॅक्सने श्रीलंकेला सर्वाधिक तीन हादरे दिले. जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर जेमी ओव्हरटने एक विकेट घेतली.

























































