16 वर्षांखालील मुलांना मोबाईलबंदी; शिक्षणावर होतोय विपरीत परिणाम, कर्नाटकमध्ये सरकारचा प्लॅन तयार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

16 वर्षांखालील मुलांना मोबाईल बंदी लागू करण्याचा कर्नाटक सरकारचा विचार आहे. सोशल मीडियाचे व्यसन, मानसिक स्वास्थ्य आणि शिक्षणावर होणारा विपरीत परिणाम पाहता विद्यार्थ्यांना डिजिटल शिस्त लावण्याचे नवे धोरण कर्नाटक सरकार आखत आहे.

आजच्या काळात मुलांच्या हातात मोबाईल जास्त असतो याबद्दल चिंता व्यक्त होतेय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, 16 वर्षांखालील मुलांच्या मोबाईल फोन वापरावर बंदी आणण्याचा शक्यतेवर विचार करत आहोत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात कुलपतींसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री म्हणाले, डिजिटल एक्सपोजरचा मुलांवर चुकीचा प्रभाव पडत आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशात मुलांच्या सोशल मीडिया वापराच्या दृष्टीने कडक पावले उचलली जात आहेत. या मॉडेलचा अभ्यास केला जात आहे.

मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम

सोशल मीडियाच्या अतिआहारी जाण्याने मुले तणावग्रस्त होतात. त्यांची झोप अपुरी होते. अभ्यासावरून लक्ष उडते. सतत स्क्रीन पाहत राहिल्याने  मेंदू सतत तुलना करत राहतो. दुसऱया मुलाचे परफेक्ट आयुष्य बघून मनात ईर्षा निर्माण होते. सायबर बुलिंग हीदेखील मोठी समस्या आहे. नकारात्मक टिपणी केल्याने मुलांचा आत्मविश्वास कमी होतो.

गोवा सरकारनेही उचलले पाऊल

लहान मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईमबद्दल याआधी गोवा सरकारनेही पावले उचलली आहेत. आंध्र प्रदेश सरकारही 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा विचार करत आहे. जागतिक स्तरावरदेखील हा मुद्दा गंभीरपणे घेण्यात आला आहे. ब्रिटनदेखील मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत नव्या नियमांचा विचार करत आहे.

मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पूर्णपणे बंदी घातली जाणार नाही. आयटी विभागाने मेटा कंपनीसोबत ‘डिजिटल डिटॉक्स’  कार्यक्रम  सुरू केला आहे. यामध्ये मुलांना शिकवले जाईल की, मोबाईलचा मर्यादित वापर कसा केला जाईल, अभ्यास आणि स्क्रीन टाईममध्ये संतुलन कसे राखायचे.