
संपूर्ण मुंबई शहर प्रचंड धुरक्याने वेढले आहे. प्रदूषणाच्या भीषण पातळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे खासगी बांधकामांना किमान आठवडाभरासाठी स्थगिती द्यावी आणि प्रत्येक प्रभागानुसार बांधकाम वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी करीत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले. एका बाजूला प्रदूषण तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा ऱहास… दोन्ही पालिकेने थांबवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी ’एक्स’ पोस्टमध्ये म्हटले.
मुंबईतील प्रदूषणाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रदूषणाची भीषण पातळी असलेले कोणतेही शहर पर्यटकांना आकर्षित करू शकत नाही, गुंतवणूक आणू शकत नाही किंवा स्वतःच्या नागरिकांचे आरोग्य टिकवू शकत नाही. प्रदूषणाची स्थिती गंभीर झालेली असताना आणि नुकत्याच पार पडलेल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये राज्य सरकार व महापालिकेने मोठमोठे दावे व सामंजस्य करार केलेले असतानाही आता सुमारे 45,000 खारफुटीची झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
सर्वच भागांतील मैदानांचे लेखापरिक्षण करावे
दहा वर्षांपूर्वी पुलाब्यातील बॅक गार्डन येथे जलतरण तलाव उभारण्याच्या स्थानिक नेत्याच्या प्रस्तावाला विरोध करून आम्ही तिथल्या मातीच्या नैसर्गिक मैदानाचे जतन केले होते. येथे मातीच्या मैदानाऐवजी काँक्रीट जंगल करण्यासाठी व नियंत्रित प्रवेशासाठी विधानसभा अध्यक्ष व त्यांच्या नातेवाईकांकडून पालिकेवर दबाव टाकला जात आहे. मुंबईकर हे सहन करणार नाहीत, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. शहरातील सार्वजनिक/खासगी संस्थांकडे असलेल्या मैदानांचे लेखापरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नगरविकास मंत्र्यांकडून महालक्ष्मी रेसकोर्स येथे भूमिगत वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव पुन्हा समोर आला आहे. हा प्रस्ताव कंत्राटदार व बिल्डरांच्या फायद्यासाठी आहे, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.





























































