
अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देत असताना राज्याची आर्थिक शिस्त बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल आणि त्यासाठी आवश्यकता पडली तर कडक पावले उचलायला मागेपुढे पाहणार नाही, असे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांचे हे विधान म्हणजे लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांना कात्री लागण्याचे संकेत तर नाहीत ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सरकारच्या वतीने चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबाबत माहिती दिली. अधिवेशनात 15 विधेयकेही मांडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार भावूक
उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांचे हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी बोलताना त्या अजित पवारांच्या आठवणींनी भावूक झाल्या. अजितदादांनी अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर्षी त्यांचा बारावा अर्थसंकल्प ठरला असता. त्यांनी कधीही आर्थिक तडतोड केली नाही. शिस्त व विकासाचा समतोल राखत काम केले. त्यांनी अर्थसंकल्पाची जोरात तयारी सुरु केली होती पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. ते आपल्याला सोडून गेले असे सांगतानाही त्या अत्यंत भावूक झाल्या होत्या.
व्हीएसआर कंपनीचेही ऑडीट सुरू
व्हीएसआर कंपनीचेही डीजीसीएकडून ऑडीट केले जात आहे. गेल्या काही वर्षांतील सर्व विमान उड्डाणांचे ऑडीट केले जात आहे. लॉग बुक, मेन्टेनन्स योग्य प्रकारे होता की नाही त्याची चौकशी केली जात आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल येईपर्यंत प्रतिक्षा केली पाहिजे असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचाही ‘त्या’ विमानातून प्रवास
व्हीएसआर कंपनीच्या विमानातून देशभरातील सर्व नेते प्रवास करतात. अजित पवारांच्या ज्या विमानाला अपघात झाला त्याच विमानातून मी चार-पाच वेळा प्रवास केला होता अशी आठवण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितली.
झिरवाळ यांना ‘क्लिन चीट’
मंत्री कार्यालयात एखादा कर्मचारी पकडला गेला तर त्याला मंत्र्याचा आशिर्वाद-वरदहस्त आहे असे समजण्याचे कारण नाही असे स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना आज क्लीन चीट दिली. अॅन्टी करप्शन शाखा आधी पूर्ण पुरावे तयारे करते, संभाषण रेकॉर्ड करते किंवा संबंधित व्यक्तीसोबत जाऊन काय बोलणे झाले आहे त्याची नोंद घेते. त्या नोंदीमध्ये नावे येतात आणि ज्यांच्याविरुध्द थेट पुरावे असतात त्यांच्यावर कारवाई होते. या प्रकरणात कोणत्याही पुराव्यांमध्ये किंवा संभाषणामध्ये मंत्र्याचे नाव आलेले नाही. तसे पुरावे असते तर निश्चितच मंत्र्यांनाही राजीनामा द्यायला सांगितले असते असे फडणवीस म्हणाले.
अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी उत्तर दिले. अपघाताची डीजीसीएच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. सुरक्षा महासंचालक स्वतः चौकशी करत आहेत. राज्यानेही सीआयडी चौकशी सुरू केली होती पण राष्ट्रवादी कॉंग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केल्याने आपण केंद्र सरकारला तसे पत्र लिहिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यासंदर्भात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही बोललो असल्याचे ते म्हणाले. विमानाचा डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर पूर्णपणे डाऊनलोड करण्यात आला आहे. व्हॉईस रेकॉर्डरचाही डाटा मिळवण्यासाठी परदेशातील लोकांचीही मदत घेतली जात आहे. विमानाचे अवशेष, मेन्टेनन्स रेकाँर्ड या सर्वांची चौकशी सुरु आहे.





























































