
मंद, फिरकीला डोळा मारणारी खेळपट्टी, धावा काढताना घाम फुटणारी परिस्थिती आणि अंतिम सामन्याचा दडपणाचा डोंगर, पण हिंदुस्थान ‘अ’ ला अशा प्रसंगांतच रंग चढतो. तेजल हसबनीसच्या नाबाद 51 धावांच्या झंझावाताने आणि प्रेमा रावतच्या फिरकीच्या जादूने एसीसी महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेवर पुन्हा एकदा हिंदुस्थानचेच नाव कोरले.
एकवेळ अशी होती की हिंदुस्थानी ‘अ’ संघाच्या 44 धावांत चार विकेट पडल्या होत्या आणि ड्रेसिंगरूममध्ये साऱयांचेच चेहरे पडले होते, पण तेव्हा तेजल म्हणजे नावातच तेज असलेल्या पुणेकर हसबनीसने 34 चेंडूंत 51 धावा ठोकत खेळपट्टीची भाषा बदलली. तिच्या साथीला कर्णधार राधा यादवसुद्धा खंबीरपणे उभी राहिली. 30 चेंडूंत 36 धावा करत तिने संघाला धीर दिला. दोघींनी पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी रचत 20 षटकांत 134 धावांचा डोंगर उभा केला.
हा डोंगर बांग्लादेश ‘अ’ साठी एव्हरेस्ट ठरला. 135 धावांचा पाठलाग सुरू होताच हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी जाळं टाकलं. तिसऱयाच षटकात 12 धावांत पहिला धक्का बसला आणि त्यानंतर बांग्लादेश कधीच सावरू शकला नाही. प्रेमा रावतच्या फिरकीने बांगलादेशी संघाला गरागरा फिरवले. तिने चार षटकांत 12 धावांत तीन विकेट घेत बांगलादेशला पराभवाच्या टेकडीवर उभे केले. तिचा क्लासिकल लेग-ब्रेक शमीमा सुल्तानाच्या बॅटला चाटून गेला आणि अतिरिक्त उसळीमुळे थेट झेलात विसावला. तो क्षण म्हणजे अंतिम सामन्यावर शिक्कामोर्तबाची सही होती.
त्यानंतर बांगलादेश संघ धडपडत 19.1 षटकांत 88 धावांत आटोपला आणि हिंदुस्थान ‘अ’ने 46 धावांनी दणदणीत विजय मिळवला. जणू 2023 च्या अंतिम सामन्याची पुनरावृत्तीच. पुन्हा तोच प्रतिस्पर्धी, पुन्हा तोच निकाल. फरक एवढाच की, यावेळी विजय अधिक आक्रमक होता.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान ‘अ’ ः 20 षटकांत 7 बाद 134 (तेजल हसबनीस 51, राधा यादव 36; फहिमा खातून 25/4)
बांगलादेश ः 19.1 षटकांत सर्वबाद 88 (शमीमा सुल्तान 20, , सरमीन सुल्ताना 18; प्रेमा रावल 12/3, सोनिया मेंधिया 21/2, तनुजा कंवर 11/2).


























































