नागाशी स्टंटबाजी महागात; विरारमध्ये मद्यपीचा मृत्यू, विषारी सापाने हाताला घेतला चावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागोबाशी स्टंटबाजी करणे मद्यपीला चांगलेच महागात पडले आहे. सापाचे तोंड हातात पकडून गळ्याभोवती फिरवून त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले जात होते. मात्र याचदरम्यान विषारी सापाने राजू बरड याला दंश केला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विरार पश्चिमेतील नवापूर परिसरात राजू बरड आला होता. तो दारूच्या नशेत होता. याचवेळी त्याला साप दिसला. क्षणाचाही विलंब न करता त्याने सापावर झडप घातली आणि त्याला पकडले. एका हाताने सापाचे तोंड आणि दुसऱ्या हातात शेपटी पकडून गळ्याभोवती गुंडाळत होता. आश्चर्य म्हणजे राजू या सापाला चावाही घेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. परंतु त्याचवेळी राजूची पकड सैल होताच सापाने त्याच्या हाताला चावा घेतला.

व्हिडीओ व्हायरल

राजूची परिस्थिती गंभीर झाल्याने स्थानिकांनी त्याला बोळींज येथील पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मद्यप्राशन केल्यामुळे विष शरीरात पटकन भिनल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.