
राजस्थानमधील भाजपचे माजी खासदार सुखबीर जौनपुरिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जौनपुरिया महिलांना त्यांचे नाव विचारत असून एक महिला मुस्लीम असल्याचे समजताच त्यांनी तिच्याकडून भेट दिलेले ब्लँकेट परत घेतल्याचे दिसत आहे. या भेदभावावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
रविवारी जौनपुरिया यांनी टोंक जिल्ह्यातील भदोडी गावात ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी आजुबाजूच्या गावातून मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. काही मुस्लीम महिला देखील या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्यानंतर महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आल्या.
दरम्यान ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रमादरम्यान जौनपुरिया हे महिला बसलेल्या तिथे आले व त्यांनी एका महिलेला तिचे नाव विचारले. त्या महिलेने तिचे नाव सकुरान खान असे सांगितले. त्यानंतर जौनपुरिया भडकले व म्हणाले की, ‘जे लोकं पंतप्रधानांना शिव्या देतात त्यांना ब्लँकेट घ्यायचा हक्क नाही”. त्यानंतर जौनपुरिया यांनी त्या महिलेला ब्लँकेट तिथेच ठेवून तिथून बाजूला जाऊन बसायला सांगितले. तसेच त्यानंतर इतर मुस्लीम महिलांकडून देखील ब्लँकेट परत घेतले.

























































