
मेक्सिकोतील सर्वात शक्तिशाली आणि गेल्या काही काळापासून फरार असलेला ड्रग्ज माफिया एल मेंचो (वय – 59) लष्करी कारवाईत मारला गेला आहे. मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. एल मेंचो हा लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर ड्रग्ज माफियांनी मेक्सिकोमध्ये हैदोस घातला असून ठिकठिकाणी हिंसाचार, जाळपोळ सुरू झाली आहे.
एल मेंचो हा जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल अर्थात सीजेएनजीचा प्रमुख होता. मेक्सिकोसह अमेरिकेनेही त्याचा मोस्ट वॉण्टेड लिस्टमध्ये समावेश केला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. मेक्सिकन संरक्षण दलाने त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात केली होती. तो जलिस्को राज्यातील डोंगराळ भागात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर मेक्सिकन सुरक्षा दलांनी येथे खास ऑपरेशन राबवले. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचे चार सदस्य मारले गेले, तर एल मेंचो आणि त्यांचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी अवस्थेत मेक्सिको शहरातील रुग्णालयात नेत असताना एल मेंचो याचा मृत्यू झाला. या कारवाईवेळी तीन सैनिकही जखमी झाले.
US, Canada issues advisory to their citizens in Mexico after killing of El Mencho
Read @ANI Stroy l https://t.co/CUAnywI9Oy #US #Canda #Mexico #ElMencho #MexicanCartel pic.twitter.com/FSdMd1iKUe— ANI Digital (@ani_digital) February 22, 2026
दरम्यान, एल मेंचोच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याच्या समर्थकांनी आणि कार्टेलच्या सदस्यांनी मेक्सिकोच्या विविध भागात धुमाकूळ घातला आहे. जलिस्को, गुआनाजुआतो, नायरिट आणि मिचोआकन या राज्यांमध्ये ड्रग्ज माफियांनी बस, ट्रक आणि कार पेटवून दिल्या आहेत. तसेच मुख्य महामार्गांवर वाहने उभी करून रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत. ग्वाडलहारा सारख्या मोठ्या शहरांमध्ये लोक भीतीने सुरक्षित स्थळी धाव घेत असून सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गव्हर्नर पाब्लो लेमस नवारो यांनी राज्यात ‘कोड रेड’ सुरक्षा अलर्ट जारी केला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
मेक्सिकोमधील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांसाठी सुरक्षेचा इशारा जारी केला असून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे. तसेच हिंदुस्थान सरकारनेही आपल्या नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी केली आहे. मेक्सिकोत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सावध राहण्याच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोण होता एल मेंचो?
एल मेंचो हा एकेकाळी पोलीस अधिकारी होता. त्यानंतर त्याने ‘जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल’ स्थापन केले. गेल्या दशकात हे संघटन मेक्सिकोमधील सर्वात शक्तिशाली आणि क्रूर गुन्हेगारी टोळी बनले होते. अमेरिकेत होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा हा प्रमुख स्रोत मानला जात होता. अमेरिकेने त्यांच्यावर 1.5 कोटी डॉलर्सचे (136 कोटी रुपये) बक्षीस ठेवले होते.

























































