
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी अजून पुरता सावरला नाही तोच सोमवारी पुन्हा मराठवाडय़ाला अवकाळीचे ग्रहण लागले! मराठवाडय़ासह पूर्व विदर्भातील काही जिह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. मराठवाडय़ातील लातूर, परभणी, बीड तसेच नांदेड जिल्हय़ात तर पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाला. रेणापूर भागाला तुफान गारपिटीने झोडपून काढले. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारीसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याच्या मोहोरालाही या अवकाळीने नजर लावली. दरम्यान, हिमायतनगर तालुक्यात पारडी येथे वीज पडून विशाखा सचिन येलकेवाड (32) ही महिला ठार झाली.
गेल्या वर्षी मे महिन्यापासून मुक्कामी असलेला पाऊस दिवाळी करूनच परतला. अतिवृष्टीच्या तडाख्याने संपूर्ण मराठवाडय़ातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. महापुराने घातलेल्या मगरमिठीने शेतजमिनी खरवडून गेल्या. गोरगरीब शेतकऱयांचे संसार वाहून गेले. दुभती जनावरे खुंटय़ालाच आचके देऊन गेली. फडणवीस सरकारने 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. दिवाळीला शेतकऱयांच्या खात्यात पैसे येणार असेही सांगितले. परंतु अद्याप खडकूही शेतकऱयांना मिळालेला नाही. सरकारवर विश्वास ठेवला तर उपाशीच राहण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी स्वतःच कामाला लागला. रबीचा हंगाम हातातोंडाशी असतानाच अवकाळीने पुन्हा शेतकऱयांचा घात केला.
गुडसुर, येरोळ येथेही वादळी वाऱयासह जोरदार पाऊस झाला. निलंग्यातही विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. सध्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. अचानक आलेल्या अवकाळीमुळे हरिनाम सप्ताहाच्या मंडपांमध्येही धावपळ उडाली. वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. हातातोंडाला आलेली हरभरा, गहू, ज्वारीची पिके मातीत मिसळली. कांदे, मेथी, टोमॅटो, शेपू, मिरची, दोडका, कोबी, कोथिंबिरीसह इतर पालेभाज्यांचेही नुकसान झाले आहे.
लातूर जिल्हय़ात रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे गारपिटीसह 20 मिनिटे वादळी पावसाने धूमशान घातले. चांगल्या बोराएवढय़ा गारांनी आंब्याच्या मोहोराचे वाटोळे केले. उभा असलेला गहू आडवा झाला. हरभरा, ज्वारीही आडवी झाली. शेतशिवारात गारांचा खच साचला. अहमदपूर शहर आणि तालुक्यातही जोरदार अवकाळी पाऊस झाला. किनगाव आणि परिसरात अवकाळीने उभी पिके आडवी झाली. वादळी वाऱयामुळे वीजही गायब झाली. चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ परिसरातही पावसाने हजेरी लावली. शिरूर अनंतपाळ येथेही वादळी वाऱयासह पाऊस झाला.
उभी पिके सपाट
नांदेड जिह्यातही मुक्रमाबाद, हिमायतनगर, माहूर, पुंडलवाडी, भोकर, उमरीसह अनेक ठिकाणी वादळी वाऱयासह पावसाने हजेरी लावली. माहूर येथे सोमवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पुन्हा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेला गहू आडवा झाला. आंब्याचे या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. हरभरा, ज्वारीही पावसाने आडवी केली. परभणी जिल्हय़ात पालम, ताडकळस, माखणी, शिरकळसपूर आदी परिसराला अवकाळीने झोडपून काढले.

































































