मेरठमध्ये भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच चिमुकल्यांसह सहा जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील लिसाडी परिसरातील किदवईनगरमध्ये एका कपडा व्यापाऱ्याच्या घराला लागलेल्या भीषण आगीत सून आणि पाच नातवंडांसह सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किदवई नगर गल्ली क्रमांक 3 येथे रेडीमेड कपड्यांचे व्यावसायिक इक्बाल यांचे तीन मजली घर आहे. या घराच्या तळमजल्यावर कपड्यांचे गोदाम असून वरच्या दोन मजल्यांवर इक्बाल यांची पत्नी बानो आणि त्यांची पाच मुले आपल्या कुटुंबासह राहतात. सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास, जेव्हा कुटुंबातील पुरुष मंडळी मशिदीत गेले होते, तेव्हा अचानक घराला आग लागली. गोदामात असलेल्या कपड्यांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण घर धुराने वेढले गेले. आगीची तीव्रता एवढी होती की घरातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले.

स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत शेजारच्या घराच्या छतावरून शिडी लावून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत असीमची पत्नी रुखसार (30), तिचा मुलगा अद्दास (3), सहा महिन्यांच्या दोन जुळ्या मुली नाबिया आणि इनायत, तसेच फारूकची मुलगी महविश (12) आणि मुलगा हम्मद (4) यांचा मृत्यू झाला. इक्बाल यांची पत्नी बानो यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचावकार्यादरम्यान नातेवाईक शहजाद हा देखील भाजला असून त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रात्री उशिरा जिल्हा दंडाधिकारी डॉ. व्हीके सिंह आणि एसएसपी अविनाश पांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्ट सर्किट आणि गॅस सिलेंडर गळतीमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एसएसपी अविनाश पांडे यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला असून प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आल्याचे सांगितले आहे.