
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या तालिबान चौकीवर तोफखान्यातून जोरदार मारा केल्याने दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्ल्यानंतर सीमेवरील उरघा, जका खेल, वरघा, शाहकोट आणि लंदी कोटल या पाच प्रमुख ठिकाणांवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये थेट चकमक सुरू झाली असून गोळीबाराचा आवाज दूरवर ऐकू येत आहे.
हिंदुस्थानी वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास पाकिस्तानी लष्कराने उरघा सीमेवरील अफगाण पोस्टला लक्ष केले. या हल्ल्याला तालिबानच्या सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे हा संघर्ष वेगाने इतर चार सीमावर्ती भागांतही पसरला. या गोळीबारात आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यात दोन्ही बाजूंच्या जीवितहानीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नसली तरी, सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पाकिस्तानचे लष्करी प्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी अलीकडेच अफगाणिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला होता. अफगाण भूमीचा वापर करून पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या शक्तींविरुद्ध कडक पावले उचलली जातील, असे मुनीर यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर लगेचच ही लष्करी कारवाई झाली आहे. ड्युरंड लाईन आणि तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या (TTP) मुद्द्यावरून गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले आहेत. सध्या सीमेवर दोन्ही देशांनी अतिरिक्त कुमक तैनात केली असून परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे.



























































