
टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मृत्यूपुर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून एन चंद्रशेखरन यांना नियुक्त केले. २०१७ मध्ये जेव्हा बोर्डाने तत्कालीन अध्यक्ष सायरस मिस्त्री यांना काढून टाकले तेव्हा नेतृत्व संकट निर्माण झाले. या काळात चंद्रशेखरन यांना टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सने अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीचा निर्णय पुढे ढकलला आहे. याचा अर्थ चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीचा कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कंपनी चंद्रशेखरन यांना नारळ देणार का, अशा चर्चा होत आहेत
टाटा सन्सचे सध्याचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना गेल्या वर्षी तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनुसार, चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे. त्यावेळी त्यांचे वय ६५ वर्ष असेल. एन. चंद्रशेखरन टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मधून आले होते. त्यांनी टीसीएसला जागतिक स्तरावर बळकटी दिली आणि ती समूहाची सर्वात फायदेशीर कंपनी बनवली.
चंद्रशेखरन यांना मुदतवाढ देण्याबाबत बोर्डात मतभेद निर्माण झाले. तसेच ते 65 वर्षाचेही होत आहेत. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला सहमती दर्शवली नाही. इतर संचालकांनी त्यांना पाठिंबा दिला. समूहाच्या काही नवीन कंपन्यांमध्ये वाढत्या तोट्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. कंपनीच्या बोर्ड बैठकीत या मुद्द्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी नवीन उपक्रमांमध्ये वाढत्या तोट्याचा मुद्दा उपस्थित केला. इतर संचालकांनी असा युक्तिवाद केला की ग्रीनफील्ड प्रकल्पांच्या सुरुवातीच्या टप्प्यात असा आर्थिक दबाव सामान्य आहे. चंद्रशेखरन यांच्या मुदतवाढीबाबत अद्याप सहमती नसल्याचे वृत्त पसरताच टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स सुमारे २.९४% ने घसरून दुपारी ६६८ वर व्यवहार करत होते.


























































