
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील रहिवाशांना नवीन घराचा ताबा कधी देणार, अशी विचारणा करत हायकोर्टाने म्हाडाला याचे उत्तर देण्याचे आदेश दिले.
येथील एका खोलीच्या मालकीवर वाद सुरू आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली. या खोलीचा ताबा 80 वर्षांच्या आजींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र येथील नवीन घरांचा ताबा अद्याप देण्यात आलेला नाही, असे म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी न्यायालयाला सांगितले. मग या महिलेला ताबा कधी देणार, असा सवाल न्यायालयाने केला.
या नवीन घरांचा ताबा कधी दिला जाणार याचा तपशील अधिकाऱयांकडून घेऊन कोर्ट रिसिव्हरला दिला जाईल. त्यांच्यामार्फत या महिलेलादेखील घराचा ताबा मिळेल, असे ऍड. लाड यांनी स्पष्ट केले. घरांचा ताबा कधी दिला जाईल याची माहिती पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेश देत खंडपीठाने सुनावणी 11 मार्चपर्यंत तहकूब केली.
ओसी मिळालेली नाही
ओसीसाठी पालिकेकडे अर्ज केला असून ती मिळाली की घरांचा ताबा दिला जाईल, असे ऍड. लाड यांनी सांगितले. ओसी कधीपर्यंत मिळेल, अशी विचारणा न्यायालयाने केली असता याची माहिती पुढील सुनावणीत दिली जाईल, असे ऍड. लाड यांनी खंडपीठाला सांगितले.
864 घरे तयार
पुनर्विकासातील पहिल्या टप्प्यात 864 घरे तयार आहेत. या घरांचा ताबा 26 जानेवारीला देण्याचे नियोजन होते, मात्र हा मुहूर्त हुकला. येथील बहुतांश रहिवासी हे शिवडी येथील संक्रमण शिबिरात आहेत. नवीन घराचा ताबा कधी मिळेल याची प्रतीक्षा रहिवाशांना आहे.






























































