
विपुल ग्रंथसंपदा आणि मुंबईच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ची बहुचर्चित निवडणूक येत्या 14 मार्च रोजी होणार आहे. व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
सुमारे साडेतीन हजार मतदार असलेल्या एशियाटिक सोसायटीची निवडणूक तीन महिने लांबणीवर पडली. निवडणुकीच्या तोंडावर विक्रमी 1600 नव्या सदस्यांची नोंदणी झाल्याने आणि त्यातील अनेक अर्जांची पडताळणी पूर्ण न झाल्याने पेच निर्माण झाल्याचे व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले होते. व्यवस्थापनाने दोन वेळा निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात निवडणूक घेता आली नाही. त्यानंतर आता व्यवस्थापन समितीने निवडणुकीसाठी 14 मार्च ही तारीख निश्चित केली आहे आणि आठवडाभरात मतदार यादी अंतिम करण्यात येईल, अशी माहिती उपाध्यक्ष शहरनाझ नलवाला यांनी दिली.
याच दरम्यान निवडणुकीची प्रक्रिया केवळ औपचारिकपणे किंवा घाईघाईने राबवू नये. निवडणुकीची माहिती सर्व सभासदांना तत्काळ कळवावी, अशी मागणी ‘एशियाटिक टुमॉरो’ या ग्रुपने केली आहे. व्यवस्थापन समितीने 27 फेब्रुवारी रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे संकेत दिले आहेत. मृत व्यक्ती आणि अनिवासी सदस्यांच्या नावाचा समावेश असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मतदार यादीचे सखोल आणि पद्धतशीर पुनरावलोकन करावे, अशी मागणी केली आहे.






























































