
‘डोनाल्ड ट्रम्प सरकारने जगभरातील देशांवर लावलेले टॅरिफ अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने व्यापार कराराचे ओझे फेपून द्यावे. अमेरिकेशी केलेला व्यापार करार रद्द करण्याची हिंमत दाखवावी,’ असे जाहीर आव्हान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींना दिले.
भोपाळ येथे झालेल्या ‘काँग्रेस किसान महाचौपाल’ला संबोधित करताना राहुल यांनी हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारावरून मोदी सरकारवर तोफ डागली. ‘ट्रम्प यांचा टॅरिफ मनमानी असल्याचे त्यांच्याच सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. हा निकाल येताच इतर देशांनी अमेरिकेसोबतचे करार रद्द केले; मात्र नरेंद्र मोदी यांच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही,’ असा टोला राहुल यांनी हाणला. ‘मोदी हे अमेरिकेसोबतचा व्यापार करार रद्द करू शकणार नाहीत, कारण त्यांच्यावर ट्रम्प यांचा दबाव आहे. एपस्टीन फाइल्समधील गुपितं आणि अदानीविरुद्ध अमेरिकेत सुरू असलेला न्यायालयीन खटला याची टांगती तलवार मोदींवर आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
स्वतःला वाचवण्यासाठी देश विकला!
‘नरेंद्र मोदींनी हिंदुस्थानला धोका दिला आहे. स्वतःची प्रतिमा आणि राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देश अमेरिकेला विकला आहे. मात्र, मोदींना आता कोणी वाचवू शकणार नाही. कोणतीही शक्ती त्यांना वाचवू शकणार नाही,’ असा घणाघात राहुल यांनी केला.
काँग्रेस कार्यकर्त्यांची अटक बेकायदा
एआय इम्पॅक्ट समिटमध्ये आंदोलन करणारे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ‘ही अटक बेकायदा आहे. रोजगारासाठी आंदोलन करणाऱया तरुणांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, असे खरगे म्हणाले. ‘यूपीए सरकारच्या काळात जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स सुरू होते तेव्हा याच भाजपवाल्यांनी खेळाच्या मैदानावर आंदोलने केली होती. तेव्हा यांच्या मनात कधी राष्ट्रवाद आणि देशाच्या एकतेचा विचार का आला नाही? तेव्हा हिंदुस्थानबद्दल जगाला काय वाटेल याची चिंता यांना वाटली नाही. त्यामुळे यांनी लोकांना शिकवण्याऐवजी स्वतःकडे पाहावे,’ असा सणसणीत टोला खरगे यांनी हाणला.
Rahul Gandhi Challenges PM Modi to Cancel US Trade Agreement
Rahul Gandhi slams PM Modi over the India-US trade pact, citing the US Supreme Court’s decision to scrap tariffs. He challenges the PM to show courage and cancel the deal.


























































