
सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेऊन 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिचा खासगी व्हिडीओ रेकॉर्ड करून बदनामी केल्याची घटना केडगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य संतोष गायकवाड (पत्ता माहिती नाही) या तरुणाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात महिन्यांपूर्वी फिर्यादी तरुणीची इन्स्टाग्रामवर आदित्य गायकवाडशी ओळख झाली होती. त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेचा खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर त्याने पीडितेकडे शारीरिक संबंधाची मागणी करत तिला धमकावण्यास सुरुवात केली. संशयित आरोपी कोणताही कामधंदा करत नसल्याचे समजल्यानंतर पीडितेने त्याच्याशी संपर्क तोडला होता.
दरम्यान, पीडितेचा दुसऱया मुलासोबत साखरपुडा निश्चित झाल्याचे समजताच संशयित आरोपीने रागाच्या भरात तो खासगी व्हिडीओ पीडितेच्या होणाऱया पतीला आणि नातेवाईकांना पाठवून दिला. यामुळे ठरलेला विवाह मोडला आहे.
एवढेच नव्हे तर संशयित आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळही केली. यामुळे पीडितेने अखेर पोलिसांत धाव घेतली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करीत आहेत.





























































