
प्रेमदासावर बुधवारी रंगणार आहे सुपर-8 फेरीतील सर्वाधिक रोमहर्षक सामना. यजमान श्रीलंका आणि झुंजार न्यूझीलंड या दोन्ही अडखळलेल्या संघांना पराभव परवडणारा नाही. हा सामना म्हणजे अक्षरशः अस्तित्वाची लढाई. जो हार गया समझो बाहर गया.
ऑस्ट्रेलियावरच्या दणदणीत विजयाने श्रीलंकेचा आत्मविश्वास गगनात गेला होता, पण झिम्बाब्वे आणि इंग्लंडकडून सलग धक्क्यांनी तो कोसळला. न्यूझीलंडचा पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसाने हिरावला. हातात केवळ एक गुण. आणखी एक पराभव झाला तर कीवींची उपांत्य फेरी इतर समीकरणांवर अवलंबून असेल तर श्रीलंकेसाठी तर थेट बाहेरचा रस्ता.
निस्सांकाची कसोटी, फर्ग्युसनचा वेग
पथूम निस्सांका वेगाविरुद्ध ढळतो. 140 किमीपेक्षा जास्त वेगावर सरासरी फक्त 14 धावांची. आता लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री ही त्याची कमजोरी भेदायला सज्ज झालेत. लंकेच्या मधल्या फळीत सातत्य नाही, पवन रत्नायकेला सॅण्टनर – सोधीची फिरकी अडचणीत आणू शकते. कामिंदू मेंडिस व वेल्लालागेविरुद्ध ग्लेन फिलिप्सची ऑफस्पिन प्रभावी ठरू शकते.
किवींची खोली, लंकेची जबाबदारी
फिन अॅलन फिरकीसमोर काहीसा मंदावतो, पण मार्प चॅपमन व डॅरिल मिचेल 200च्या स्ट्राइक रेटने खेळू शकतात. 170 पेक्षा अधिक धावांचा पाठलागही इथे शक्य आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या फलंदाजांवर जबाबदारी असेल. सात दिवसांची विश्रांती घेतलेले किवी ताजेतवाने होऊन मैदानात उतरतील आणि दुसरीकडे श्रीलंकेला सर्व आघाडय़ांवर सरस खेळावे लागणार आहे.































































