ठाणे पालिकेने ६१ उमेदवारांना बजावल्या नोटिसा, १५ दिवसांत निवडणूक खर्चाचा हिशेब द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ६१ उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशेबच दिला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या उमेदवारांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या असून १५ दिवसांत निवडणूक खर्चाचा हिशेब द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा दिला आहे.

ठाणे महापालिकेची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली. या निवडणुकीत ६४८ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यापैकी १३१ नगरसेवक निवडून आले.

निवडणुकीतल्या उमेदवारांना खर्चाचा तपशील देणे बंधनकारक होते. मात्र निवडणूक झाल्यानंतरही ६१ उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही. आतापर्यंत ५८७ उमेदवारांनी आपल्या निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशेब दिला असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र ६१ उमेदवारांनी आतापर्यंत खर्चाचा तपशील दिला नसल्याने या सर्व उमेदवारांना पालिका प्रशासनाने शेवटचा अल्टिमेटम दिला आहे.

अपक्षासह अनेक राजकीय पक्षांतील उमेदवार

राज्य निवडणूक आयोगाने विजयी तसेच पराभूत उमेदवाराकडून निवडणुकीचा खर्च घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. पालिका प्रशासनाने निवडून आलेल्या तसेच पराभूत उमेदवार अशा एकूण ६४८ उमेदवारांना खर्चाचा हिशेब मागितला. मात्र त्यानंतही ६१ उमेदवारांनी खर्चाचा हिशेब दिला नाही. यामध्ये अपक्षासह अनेक राजकीय पक्षातील उमेदवार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

विलंबाचाही खुलासा करा

पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत हा हिशेब देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही हिशेब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कामचुकार उमेदवारांनी विलंबाच्या खुलाशासह खर्चाचा हिशेब तत्काळ द्या, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान हिशेब न देणाऱ्या उमेदवारांना पुढील तीन वर्षांसाठी निवडणूक लढवता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले