बोगस पदवी, बनावट न्यायाधीश अन् ५ वर्षे हायकोर्टात ‘न्यायदान’; पाकिस्तानातील न्याय’अवस्था’ आली जगासमोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pakistan high court judge tariq mahmood jahangiri removed fake law degree saamana news update

पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेची भयंकर अवस्था दाखवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका न्यायाधीशाने कायद्याची खोटी पदवी सादर करून तब्बल पाच वर्षे इस्लामाबाद उच्चन्यायालयात (IHC) न्यायाधीश म्हणून काम केले आणि अनेक निकालही दिले. मात्र, आता ही पदवी बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने उच्चन्यायालयाने या न्यायाधीशाची हकालपट्टी केली असून त्यांनी दिलेले निकालही कायदेशीररित्या अवैध ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘डॉन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इस्लामाबाद उच्चन्यायालयाने सोमवारी (२३ फेब्रुवारी) ११६ पानांचा सविस्तर निकाल देऊन न्यायाधीश तारिक महमूद जहांगिरी यांना पदावरून हटवले आहे. जहांगीरी यांची डिसेंबर २०२० मध्ये उच्चन्यायालयात नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांच्या पदवीवर संशय निर्माण झाल्याने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून त्यांना न्यायालयीन कामकाज करण्यापासून रोखण्यात आले होते.

कराची विद्यापीठाच्या रेकॉर्डमुळे फुटले भांडण

कराची विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने सादर केलेल्या मूळ कागदपत्रांच्या आधारे उच्चन्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. जहांगिरी यांनी सादर केलेली शैक्षणिक कागदपत्रे बनावट असून, त्यांनी दुसऱ्याच्या नावाचा वापर करून आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी फसवणूक केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

परीक्षेत कॉपी करताना पकडले होते

न्यायालयाने नमूद केले की, जहांगिरी यांनी १९८८ मध्ये बनावट एनरोलमेंट नंबर वापरून परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते आणि १९८९ मध्ये विद्यापीठाने त्यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली होती. मात्र, ही शिक्षा स्वीकारण्याऐवजी त्यांनी पुन्हा फसवणुकीचा मार्ग अवलंबला. पुढच्याच वर्षी त्यांनी इम्तियाज अहमद नावाच्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा एनरोलमेंट नंबर चोरून ‘तारिक जहांगिरी’ या नावाने पुन्हा परीक्षा दिली.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गव्हर्नमेंट इस्लामिया लॉ कॉलेजच्या प्राचार्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, जहांगिरी यांनी या संस्थेत कधीही प्रवेश घेतला नव्हता. उच्चन्यायालयाने जहांगिरी यांना त्यांची मूळ कागदपत्रे आणि लेखी उत्तर सादर करण्यासाठी अनेक संधी दिल्या, परंतु ते पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले.

वेळकाढू धोरण आले अंगाशी

स्वतःचा बचाव करण्याऐवजी जहांगिरी यांनी पूर्ण खंडपीठाची मागणी करणे, मुख्य न्यायाधीशांनी सुनावणीतून बाजूला होण्याची मागणी करणे आणि प्रलंबित प्रकरणांचे कारण देऊन सुनावणी लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न केले. न्यायालयाने याला ‘वेळकाढू धोरण’ (Dilatory Tactics) असे संबोधले. याचिकाकर्त्याने पुरावे सादर केल्यामुळे आता स्वतःची पदवी वैध असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी जहांगिरी यांची होती, ज्यात ते अपयशी ठरल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

pakistan high court judge tariq mahmood jahangiri removed fake law degree saamana news update

Islamabad High Court removes Justice Tariq Mahmood Jahangiri for serving 5 years with a fake law degree. Read the shocking details of fraud on Saamana.com.

Keywords:
Saamana, Samana, Samna, दैनिक सामना, सामना, Pakistan News.