
संगमेश्वर-मुंबई- गोवा महामार्गापासून सुरु होणाऱ्या सातारा व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा संगमेश्वर-पाटण घाटमार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम मोनार्च इंजीनीअरींग या कंपनीला देण्यात आले आहे. या कामाचा प्राथमिक विकास आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उत्तर रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी दि.२४ डिसेंबर २०२४ रोजी मोनार्च इंजीनियरींग कंपनीला कार्यारंभ आदेश दिला आहे.
कार्यरंभ आदेश देवून 14 महिने उलटूनही घाटमार्ग सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. १९९९ मध्ये भूमिपूजन झालेल्या या घाटमार्ग कामासाठी 27 वर्षांनंतर पहिल्यांदाच आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून सन २०१८ च्या अर्थसंकलपात निधीची तरतूद करण्यात आली होती. संगमेश्वर – पाटण घाटमार्ग कामाचे भूमीपूजन २७ वर्षापुर्वी सन १९९९ ला करण्यात आले होते. या कामासाठी २७ वर्षे प्रतिक्षा करावी लागली आहे.
या कामाच्या सर्व्हेक्षणासाठी निधीची तरतुद करुन ८ वर्षांचा आणि कार्यारंभ आदेश देवून १४ महीन्यांचा कालावधी लोटला आहे. या कामाला गती मिळावी म्हणून संगमेश्वर – पाटण घाटमार्ग समन्वय समिती चे समन्वयक संतोष येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव यांना दि. ३० सप्टेंबर २०२५ व ०८ जानेवारी २०२६ रोजी पत्रव्यवहार केला होता त्यावेळी अपर मुख्य सचिव यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र अद्याप काम सुरु होत नसल्याने कामात दिरंगाई करणाऱ्या व्यवस्थे विरोधात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत समन्वयक संतोष येडगे यांनी १७ मार्च २०२६ पासून मंत्रालय मुंबई या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे तसे निवेदन त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांना दिले आहे.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग रत्नागिरी जिल्हा हद्दीपर्यंतचा घाटरस्ता हा रत्नागिरी जिल्ह्याच्या सन २००१-२०२१ रस्ते विकास मध्यावधी पुनर्विलोकन योजनेप्रमाणे प्रमुख जिल्हा मार्ग ४७ “संगमेश्वर नायरी निवळी ते रत्नागिरी जिल्हा हद्दीपर्यंतचा घाट रस्ता” असा दर्शविला असून त्याची एकूण लांबी २५.०० किलोमीटर दाखविली आहे. तथापी प्रत्यक्षात जिल्हा हद्दीपर्यंत लांबी अंदाजे २६.६०० किलोमीटर एवढी आहे. त्यापैकी कि.मी ०/० ते २१/१०० एवढी लांबी डांबरी पृष्ठभागाची आहे. त्यापुढे रस्ता अस्तित्वात नाही.
हा रस्ता पनवेल – महाड – पणजी ( राष्ट्रीय महामार्ग १६६ ) वरील संगमेश्वर गावापासून सुरु होवून संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर, कसबा, फणसवणे, कारभाटले, नायरी, निवळी गावांमधून लगतच्या सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज, कोळणे, मळे, गोठणे, ढोकावळे, कोकरुड, रिसवड , चाफेर ते प्रमुख जिल्हा मार्ग ५६ ( सातारा जिल्ह्यातील रस्ता ) चाफेर गावाजवळ जावून मिळतो. एकूण ४६.६०९ कि.मी लांबीच्या या घाटमार्गापैकी दोन्ही जिल्ह्यातील २६.६०० कि.मी एकेरी रस्ता तयार आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील ५.५०० कि.मी आणि सातारा जिल्ह्यातील १४.५०० कि.मी अशा एकूण २० कि.मी लांबीचे काम सद्यस्थितीत पुर्ण केल्यास हा घाटमार्ग नागरीकांसाठी वाहतूकीसाठी खुला होवून दोन जिल्ह्यातील नागरीकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
संगमेश्वर – पाटण घाटमार्ग ज्या गावांमधून जाणार आहे त्या संगमेश्वर तालुक्यातील आजूबाजूच्या परीसरातील साधारण ७० गावांमधील १ लाख लोकसंख्येला तर चिपळूण तालुक्यातील साधारण ५० हजार व रत्नागिरी तालुक्यातील १ लाख आणि पाटण तालुक्यातील गावांमधून जाणा-या आजूबाजूच्या परीसरातील साधारण १ लाख अशा एकूण साडेतीन ते चार लाख लोकसंख्येला याचा थेट फायदा होवून दळण – वळण सुधारणार आहे. सध्या येथील जनतेला पाटण जि.सातारा या ठिकाणी जाण्यासाठी १२३ किलोमीटर चिपळूण मार्गे वळसा देवून जावे लागते त्या ऐवजी संगमेश्वर – पाटण घाटमार्ग झाल्यास हे अंतर ४६.६०९ वर येईल दोन्ही जिल्ह्यातील नागरीकांचे ८० किलोमीटर अंतर वाचणार आहे.
हा घाटमार्ग केल्यास इंधनाची बचत होवून महागाईवर नियंत्रण आणण्यास मदत होईल त्या शिवाय प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल आणि संगमेश्वर – पाटण या दोन्ही तालुक्यांच्या बाजारपेठा थेट जोडल्या जावून बाजारपेठांमधून भाजीपाल्या सह इतर सर्व व्यवहार वाढतील तर पाटण मार्गे पश्चिम महाराष्ट्र संगमेश्वर बाजारपेठेला जोडल्यामुळे वाहतूक खर्च कमी होवून त्याचा थेट फायदा येथील जनतेला होईल त्या शिवाय अंतर वाचल्यामुळे इंधनाचा खर्च ही कमी होवून रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनात अधिक भर पडणार आहे.




























































