
>> अजित कवटकर, [email protected]
परीक्षेतील गुणांवरून तुमच्यातील गुणांची पारख होणार असेल, तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार होणार असेल तर मग अशी ‘मेक ऑर ब्रेक’ परीक्षा किती गांभीर्याने घेतली गेली पाहिजे आणि ती किती लक्ष केंद्रित करून दिली गेली पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. अभ्यासात स्वतःला पूर्ण झोकून देऊन, 100 टक्के मेहनत घेऊन आपले उच्चतम ध्येय गाठण्यासाठी परीक्षेला त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे.
स्कूल ड्रॉप आऊट बिलियनियर’ हे व्यक्तिमत्त्व केवळ विद्यार्थी वर्गासाठीच नव्हे, तर सर्वांसाठी एक आदर्श व आकर्षण असते. औपचारिक शिक्षण प्रणालीमधून अर्ध्यावरच बाहेर पडून उच्चविद्याविभूषित निर्मिती करणाऱ्या अशा किमयागारांची संख्या फार फार कमी. हे असे साध्य करणे अवघड असते. म्हणून ते करणारे अनन्यसाधारण ठरतात. याचाच अर्थ उरलेल्या इतरांकडे म्हणजे जवळ जवळ सर्वांनाच आपला उद्धार – उन्नती करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या शिक्षण प्रणालीमधूनच मार्ग शोधणे अपरिहार्य ठरते. माणसाच्या जीवनासाठीच्या मूलभूत गरजांच्या पंक्तीमध्ये आज शिक्षणदेखील विराजमान झाले आहे ते यामुळेच. किंबहुना आज इतर गरजांची पूर्तता आणि त्यांची गुणवत्ता शिक्षण कौशल्यांवरच आधारलेली आहे. त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही, पण इथेदेखील महत्त्वाची बाब ही की, नुसतं औपचारिकता म्हणून किंवा सगळे करतात म्हणून आपणदेखील शिक्षण घेतले पाहिजे अशा काहीशा निरुत्साही आणि चालढकल वृत्तीने जर कोणी शिकणार असेल तर त्यातून त्याच्या कर्तृत्वाला (करीअरला) किंचितदेखील मदत लाभणे शक्य नाही. कारण ज्ञानार्जन करण्यासाठी, परिपूर्ण व्यावहारिक शिक्षण प्राप्त करण्यासाठीदेखील मेहनतीची आवश्यकता असते. एखादा विद्यार्थी या मेहनतीच्या स्तरावर कुठे आहे व तो आणखी किती उंची गाठू शकतो याचा दहावी बोर्डाच्या निकालावरून अंदाज बांधणे सोपे जाते. हीच पायरी पुढील मार्गाची दिशा दाखवते. म्हणूनच इथे चुकलात, कुठे कमी पडलात तर ते जीवनभराचे शल्य ठरते.
नववीतून दहावीमध्ये पदार्पण करणारा विद्यार्थी एका ध्येयवादी महत्त्वाकांक्षेने येत असतो. मानवी स्वभावाला नवीन गोष्टींचे नेहमी अप्रूप असते, आकर्षण वाटते. त्यामुळे दहावीमध्ये येताच जबाबदारीच्या वा अपेक्षांच्या जाणिवेतून तो जिद्दीने अभ्यासाला लागतो, परंतु बहुतांश जणांमधील ही स्वयंस्फूर्ती नंतर काही दिवसांत कमजोर होत जाते आणि परीक्षेच्या ऐन तोंडावर तो उत्साह, ती जिद्द कमकुवत होते. कधी एकदाची परीक्षा आटोपते या मानसिकतेत जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा ती युद्ध सुरू होण्याअगोदरच पराभूत होण्याची स्थिती असते. असा निरुत्साह कधीच प्रेरणादायी व फलदायी ठरत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधूनमधून प्रवृत्त करावे लागते. अभ्यासाची आवड आणि त्याचे शिस्तबद्ध व परिणामकारक नियोजन याची विद्यार्थ्याला जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत शिक्षकांबरोबर पालकांना हे जाणीवपूर्वक आणि निरंतर करत राहणे भाग असते. यात मोठा खंड पडता कामा नये. कारण मुलांचे मन विचलित करणाऱ्या अगणित गोष्टी त्यांना अभ्यासापासून दूर करण्यासाठी तत्पर असतात. अभ्यासाला लागलेला मुलगा अभ्यास सोडून बाकीच्या निरर्थक व वेळकाढू गोष्टींमध्ये गुंतला की, त्याला पुन्हा रुळावर आणणे थोडे कठीण होऊन जाते.
आजची परीक्षा पद्धती, प्रश्नपत्रिका पॅटर्न अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती पाहता दहावी बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवणे हे अगोदरच्या तुलनेने अवघड राहिलेले नाही. त्यामुळेच आज नव्वद टक्के पार करणाऱ्यांचे प्रमाण हे शेकडय़ांमध्ये नव्हे, तर हजारोंच्या संख्येत असते. प्रत्येक विद्यार्थ्याने ही मजल मारावी, जेणेकरून त्याच्या महत्त्वाकांक्षांना आत्मविश्वासाचे बळ प्राप्त व्हावे, त्याच्या बुद्धिसामर्थ्याला अधिक मोठी आव्हाने उचलण्याची उमेद व प्रेरणा लाभावी हाच आजच्या एकूण परीक्षा व अभ्यास पद्धतींचा उद्देश आहे. एवढे असूनही जर एखादा विद्यार्थी या स्पर्धेत टिकून राहणारे गुण मिळवू शकत नसेल तर त्याला शिक्षणाची पुढील प्रत्येक पायरी चढणे कठीण होणारच! तरुण देश समजल्या जाणाऱ्या आणि जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील आजची असह्य स्पर्धा पाहता विद्यार्थ्यांनी निदान या पहिल्या पायरीवरील सोप्या संधीचे सोने करावे हीच अपेक्षा असते. कारण इथे मिळवलेले यशच पुढील पायरीवरील दरवाजे खुले करते.
उत्तरपत्रिका पूर्ण गुण मिळविण्याच्या हट्टानेच लिहिली गेली पाहिजे. निर्दोष व परिपूर्ण उत्तरं तर अपेक्षित आहेतच, पण शुद्धलेखन, सादरीकरण हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत, ज्यावर भरपूर सराव होणे गरजेचे असते. एकही मार्क सुटता कामा नये, चुकता कामा नये ही जिद्दच ते गुण, टक्के मिळवून देऊ शकतात, ज्याचा इतरांनाच नव्हे, तर त्या विद्यार्थ्यालादेखील अपरंपार अभिमान वाटेल. वर्षभर अभ्यास केला आणि शेवटच्या क्षणाला म्हणजे ऐन परीक्षेत जर जिद्दच गमावली तर केलेला अभ्यास आणि प्रयत्न सारं व्यर्थ ठरते. दोन किंवा तीन तासांच्या पेपरमधील कामगिरी जर तुमच्या जीवनाच्या यशापयशावर परिणाम करणार असेल, परीक्षेतील गुणांवरून तुमच्यातील गुणांची पारख होणार असेल, तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार करणार असेल तर मग इयत्ता दहावीसारखी ‘मेक ऑर ब्रेक’ परीक्षा किती गांभीर्याने घेतली गेली पाहिजे आणि ती किती लक्ष केंद्रित करून दिली गेली पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. अभ्यासात स्वतःला पूर्ण झोकून देऊन, 100 टक्के मेहनत घेऊन आपले उच्चतम ध्येय गाठण्यासाठी परीक्षेला त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे पाहिजे. त्यात जेवढे किती गुण मिळतील ते आनंदाने स्वीकारून पुढच्या वाटचालीच्या नियोजनासाठी धावपळ करायला हवी. पण त्यासाठी आधी दहावीत कुठेही कमी पडता कामा नये.




























































