
एम. ए. चिदंबरमच्या उष्ण, दमट हवेत उद्या केवळ सामना नाही, तर स्वप्नांचा जुगार रंगणार आहे. गतविजेता हिंदुस्थान आणि हरण्यासारखं काहीच नसलेला बेफिकीर मनःस्थितीतला झिम्बाब्वे अशा दोन संघांमधली लढत म्हणजे उपांत्य फेरीच्या दरवाज्यावर उभं राहून दिलेली हाक आहे. दोघांसाठी करो या मरोचा लढा. हरेल तो बॅगा भरणार, जिंकेल त्याला आणखी एक संधी मिळेल. विशेष म्हणजे नुसता विजय चालणार नाही. मोठा, दणदणीत विजय हवा. कारण गुणफलकावरच्या आकडय़ांइतकाच महत्त्वाचा आहे धावगतीचा हिशेब. आज चूक केली तर उद्या हिशेब चुकणार. उपांत्य फेरीचे स्वप्न गुंडाळावे लागणार.
झिम्बाब्वेने आधीच ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना हरवत आपली कुवत दाखवली आहे. हा संघ आता ‘लहान’ उरलेला नाही. ब्लेसिंग मुझरबानीचा उंच उसळणारा चेंडू आणि सिकंदर रझाचा सर्वांगसुंदर खेळ ही दोन शस्त्रं हिंदुस्थानी फलंदाजांच्या छातीत धडकी भरवू शकतात. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हिंदुस्थानची फलंदाजी कचरली. इशान किशन आणि अभिषेक शर्माची सलामीची जोडी तर केवळ हजेरी लावतेय. उद्या दोघांनी सलामी नाही दिली तर काही खैर नाही. जसप्रीत बुमरा आशेचा किरण आहेच, पण त्याला फलंदाजांची साथ मिळायलाच हवी. उपांत्य फेरी गाठण्याचे औषध आजच्या लढतीतूनच मिळणार आहे हे लक्षात असले तरी संघाला पुरेसे आहे.





























































