
मुंबईत सुरू असलेल्या सर्व बांधकामांवर देखरेख ठेवण्यासाठी इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) सहाय्याने एक डायनामिक मॉनिटेरिंग सिस्टम तयार करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
वांद्रे पूर्व येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचे काम करताना प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा आमदार ऍड. अनिल परब तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. मुंबईत वायू प्रदूषणाचा विषय गंभीर असून सर्वाधिक वायू प्रदूषण खेरवाडी विभागात आहे. येथे मेट्रो, बुलेट ट्रेनची बांधकामे सुरू असून त्यामुळे होणाऱया प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकामाला आमचा विरोध नाही, परंतु बांधकामादरम्यान वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऍड. अनिल परब यांनी केली. त्यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंबईत मोठय़ा प्रमाणावर हायवे, मेट्रो आणि इमारतींची बांधकामे सुरू आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर आम्ही पालिकेच्या मदतीने कारवाई करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
स्पेशल ड्राईव्ह घेऊन कारवाई करा
मुंबईत पुनर्विकासाची कामे वेगाने सुरू असून बांधकामादरम्यान नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे शासनाने सरप्राईज व्हिजिट करून नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी भाई जगताप यांनी केली. त्यावर मी स्वत- कोस्टल रोडवरून जात असताना धुळीचे लोट पाहिले आणि तिथे तत्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. यापुढेही कोणत्याही बांधकाम साईटवर प्रदूषणाची परिस्थिती निर्माण होईल तिथे आम्ही तत्काळ कारवाई करू, असे आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.





























































