
डोंबिवली पश्चिम येथील भागशाळा मैदानाजवळील पोलीस चौकीसाठी आरक्षित जागेत राजरोस चरस – गांजा विक्री, दारू पार्टी असे अनैतिक धंदे सुरू होते. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी तक्रार करताच पालिका आणि पोलीस प्रशासनाने अनैतिक धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.
भागशाळेजवळील जागेत अनैतिक प्रकार, चरस-गांजा सेवन, दारू पिणे तसेच इतर बेकायदेशीर धंदे सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवाशांकडून वारंवार केल्या जात होत्या. याशिवाय बाहेरील बेकायदा वाहनांचे पार्किंगही येथे केले जात होते. त्यामुळे परिसरातील इमारतींमधील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांनी महापालिका व पोलीस प्रशासनाकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या होत्या. तसेच स्वाक्षरी मोहिमेद्वारेही या प्रकाराविरोधात आवाज उठवला होता. मात्र प्रशासन दाद देत नव्हते. अखेर उपशहरप्रमुख राहुल चौधरी यांनी याबाबत लेखी तक्रार केल्यानंतर महापालिका व पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाई सुरू केली. यावेळी विभागप्रमुख प्रवीण विरकुड, प्रकाश कदम उपस्थित होते.
रात्रीच्या वेळी नियमित गस्त
शिवसेनेच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासनाने आज जागेची साफसफाई केली. तसेच बेकायदा पार्किंग केलेली वाहने हटवण्याच्या सूचना शहर वाहतूक विभागाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अनैतिक धंदे चालवणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तसेच रात्रीच्या वेळी नियमित गस्त घातली जाईल असेही सांगितले.






























































