Chhattisgarh Encounter – विजापूरमध्ये चकमक; सुरक्षा दलांकडून दोन माओवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील इंद्रावती नदी परिसरात गुरुवारी सकाळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत सुरक्षा दलांनी दोन माओवाद्यांचा खात्मा केला. परिसरात सुरक्षा दलांकडून शोध मोहिम सुरू आहे. दोन्ही माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, असे बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पट्टलिंगम यांनी सांगितले.

इंद्रावती नदीच्या काठावरील घनदाट जंगलात माओवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे विविध संयुक्त सुरक्षा पथके नक्षलविरोधी कारवाईसाठी तैनात करण्यात आली. यावेळी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळाची झडती घेतली असता गणवेशातील दोन माओवाद्यांचे मृतदेह सापडले. घटनास्थळाहून एसएलआर रायफल, आयएनएएसएएस रायफल आणि 12 बोअर रायफल, स्फोटके आणि इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.