
महाराष्ट्राला जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच कंत्राटदारांच्या फायद्यासाठी पालिकेच्या ठेवी मोडल्या अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.
आज विधीमंडळ परिसरात आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुकांनंतर राज्यात सकारात्मक आणि अर्थपूर्ण चर्चा घडून यावी. निवडणुका संपल्यानंतर सतत राजकीय वाद वाढवण्यापेक्षा दोन्ही बाजूंनी विधायक चर्चा व्हावी, अशी आमची मनापासून इच्छा आहे. विधिमंडळात आम्ही विषय मांडतो तेव्हा केवळ टीकेसाठी टीका करत नाही, तर सूचनाही देतो. त्या सूचनांमध्ये तथ्य आहे का, एखाद्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात खरोखर समस्या आहे का, याची पडताळणी मुख्यमंत्री आणि सरकारने करायला हवी, असे त्यांनी सांगितले.
दावोस, गुंतवणूक, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शिक्षण या विषयांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राला जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे. जगभरात दोन्ही पक्षांकडून (सरकारी आणि विरोधी पक्षांकडून) चर्चा करून निर्णय घेतले जातात, मग आपल्याकडेच सतत वाद का होतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दाव्होस दौऱ्याबाबत बोलताना काही गुंतवणूकदार करारासाठी उत्सुक असतील, पण याचा अर्थ सर्व गुंतवणूकदारांना विमानात बसवून करार करायचे असा होत नाही, असे ते म्हणाले. दावोस हे केवळ करारांसाठी नसून विविध देशांतील, राज्यांतील आणि उद्योगजगतांतील नेत्यांशी चर्चा आणि बैठकीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ असते, हे त्यांनी अधोरेखित केले.
नवीन शिक्षण धोरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, पूर्ण शिफारशी आल्यानंतर प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवण्यात आला होता. त्यानंतर काढलेल्या जीआरचे तंतोतंत पालन झाले का, त्यात बदल का केले नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषा भवन, मराठी रंगभूमीचे दालन, आरे कारशेड यांसारख्या प्रकल्पांना स्थगिती का देण्यात आली, याचाही त्यांनी उल्लेख केला. भाषाबाबत मराठी भाषा अनिवार्य असावी, दुसरी भाषा पहिल्या इयत्तेपासून सुरू व्हावी आणि तिसरी भाषा सहावी-सातवीपासून शिकवावी, अशी आमची भूमिका होती. तिसरी भाषा हिंदीच असावी असा आग्रह नसून फ्रेंच, जर्मन, ओडिया, तमिळ अशा कोणत्याही भाषेचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्हीएसआर कंपनीवर सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करत त्यांनी अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी सत्य बाहेर आलेच पाहिजे, असे म्हटले. त्याचवेळी अंदमानमध्ये हेलिकॉप्टर कोसळणे, एअर अॅम्ब्युलन्स अपघात, स्पाइसजेट विमानाचे इमर्जन्सी लँडिंग अशा घटनांचा उल्लेख करून हवाई आणि इतर अपघातांबाबत केंद्र व राज्य सरकार खरोखर गंभीर आहे का, असा सवाल त्यांनी केला.
इतिहासावरून वाद घालण्यापेक्षा बेरोजगारी, महागाई आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आवाहन केले. निवडणुकांनंतर जाहीरनाम्यातील वचने पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. “विश्वगुरू” या संकल्पनेचा उल्लेख करत मोठ्या विद्यापीठांत ऐतिहासिक व्यक्तींवर चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात देशासाठी काम कोण करत आहे, यावर विचार व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
महापालिकेच्या ठेवींबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या ठेवी कोस्टल रोड, एसटीपी, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन यांसारख्या कामांसाठी नियोजनपूर्वक ठेवल्या होत्या. 1997 पासून 600 कोटींच्या तुटीतून 92 हजार कोटींचा सरप्लस निर्माण करण्यात आला. मात्र सध्याच्या सरकारकाळात अडीच लाख कोटींची कमिटेड लायबिलिटी वाढली असून ठेवी कॉन्ट्रॅक्टरांच्या फायद्यासाठी मोडल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
बीएसटीच्या खाजगीकरणाच्या शक्यतेवरही त्यांनी टीका केली. त्यांच्या कार्यकाळात 2027 पर्यंत 10 हजार इलेक्ट्रिक बस आणण्याचे उद्दिष्ट होते, मिनी, मिडीयम आणि लॉन्ग रेंज बसेस सुरू केल्या होत्या, टॅप-इन टॅप-आउट कार्ड आणि मेट्रो-रेल्वे इंटिग्रेशनची सुरुवात केली होती. परवडणारी दररचना ठेवून दररोज सुमारे 35 लाख प्रवासी सेवा वापरत होते. आता बसस्टॉपवर रांगा वाढल्या असून डेपो विकले जात असल्याचे चित्र दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. बीएसटीला राज्य सरकार आणि महानगरपालिकेकडून भरीव मदत देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या लक्षात घेता आर्थिक वाढ अपेक्षित असली तरी सरकारच्या दाव्यांमध्ये आणि प्रत्यक्ष स्थितीत तफावत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुका जिंकून झाल्यानंतर आता राज्य आणि देश कुठे चालला आहे, याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी सरकारला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.





























































